भुजबळांनी घेतली CM फडणवीसांची भेट; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:07 IST2024-12-23T13:05:37+5:302024-12-23T13:07:54+5:30
DCM Ajit Pawar Reaction After Mla Chhagan Bhujbal Meet CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

भुजबळांनी घेतली CM फडणवीसांची भेट; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात म्हणाले...
DCM Ajit Pawar Reaction After Mla Chhagan Bhujbal Meet CM Devendra Fadnavis: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा, बैठका घेत आहेत. एकीकडे छगन भुजबळ सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करताना तीव्र नाराजी बोलून दाखवत आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत. याचाच एक भाग म्हणून छगन भुजबळ यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी समीर भुजबळ हेही उपस्थित होते. या भेटीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीत काय घडले? छगन भुजबळ म्हणाले, “आता केवळ ८-१० दिवसांत...”
मंत्रिमंडळात भाजपाच्या वाट्याचे एक मंत्रीपद रिक्त आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील नाराज आमदार लक्ष ठेवून आहेत. भाजपामधील कोणाची यावर वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातच नाराज असलेले छगन भुजबळ मंत्रिपदासाठी भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. यातच छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात म्हणाले...
राज्यात ज्या घडमोडी सुरू आहेत, त्याची कल्पना आहे. मुलांना शाळांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि वेगळे वातावरण आहे. एक आठ ते दहा दिवस मला तुम्ही द्या. आठ ते दहा दिवसांनंतर आपण पुन्हा भेटू, बोलू. निश्चितपणे चांगला मार्ग यातून शोधू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच ओबीसी नेत्यांना विनंती करत आहे की, आम्ही यावर साधक बाधक चर्चा करत आहे. आता शांततेने घेऊया, असा निरोप दिला आहे. १० ते १२ दिवसांत जे काही चांगले करता येईल, जो मार्ग काढता येईल, तो काढूया, असे सांगितल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. ओबीसींची नाराजी दूर करावीच लागेल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना, तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असे सांगत अजित पवार यांनी एका वाक्यात विषय संपवला.
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत अनेक दिवस मौन बाळगल्यानंतर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली होती. मंत्रिमंडळात काही मान्यवरांना थांबायला सांगितले, तर काहींनी रोष व्यक्त केला. वास्तविक कधी कधी नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते. इथे संधी न देता केंद्रात संधी देण्याचा आपण विचार केलेला आहे. त्यांना योग्य मानसन्मान दिला पाहिजे, तो देण्यासाठी अजित पवार तसूभर कमी पडणार नाही. पण याबाबत गैरसमज करुन वेगळी भूमिका घेणे बरोबर नाही. राज्यात कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते.