पुणे : बुधवारच्या पुरात नदीच्या पाण्यात बुडालेल्या बाबा भिडे पुलाच्या वरच्या बाजूला मोठी भेग पडली असल्याचे पाणी ओसरल्यानंतर आज लक्षात आले. काही नागरिकांनी पालिकेला याबाबत कळविले. पुलाची तपासणी केल्यानंतर भेग डांबरी थराला पडली असल्याचे निदर्शनास आले. पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचा दावा त्यानंतर पालिकेने केला. नदीपात्रातील रस्त्यावर जाण्यासाठी म्हणून या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. डेक्कन व कर्वे रस्त्यालाही त्यावरून जाता येते. थेट नदीपात्रातूनच हा पूल आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडले, की तो पाण्याखाली जातो. बुधवारी खडकवासला धरणातून सुमारे ४० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यामुळे पूल पाण्याखाली गेला. गुरुवारी सकाळी त्याला मोठी भेग पडली असल्याचे दिसले. लगेचच त्यावरून जाणारी सर्व वाहतूक थांबविण्यात आली.महाड येथे पूल पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची घटना ताजी असल्याने भिडे पुलाला भेगा पडल्याची माहिती काही नागरिकांनी त्वरित पालिकेला दिली. त्यानंतर लगेचच पुलाला भेग पडल्याची चर्चा सोशल मीडियावरून सुरू झाली. पुणेकर नागरिकांनी पालिकेच्या कारभाराचा तिथेच पंचनामा करण्यास सुरुवात केली. लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालिकेची असताना अद्याप एकही अधिकारी किंवा कर्मचारी आलेला नाही, याकडे काहींनी लक्ष वेधले, तर काहींनी साधारण २५ वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाला अशा भेगा पडत असतील, तर पालिकेच्या कामाचा दर्जा काय आहे ते यावरून दिसते, अशी टीका केली.दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुलावर येऊन पाहणी केली. त्यानंतर प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी जाहीरपणे पूल सुरक्षित असल्याचा दावा केला. त्याच्यावर असलेल्या डांबराच्या थराला भेग पडली आहे. पुलाला काहीही झालेले नाही, असे त्यांनी सांगितले. वाहतूक सुरू करण्यास हरकत नाही, असे पत्रही वाहतूक विभागाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. >सर्व पूल, वाड्यांची पाहणी करावीशहरातील सर्व जुने-नवे पूल, जुने वाडे यांची प्रत्येक पावसाळ्यापूर्वी पाहणी करावी व त्याचा अहवाल सर्वसाधारण सभेसमोर ठेवावा, अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली. महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ही आवश्यक बाब आहे, आयुक्तांनी प्रशासनाकडून त्वरित अशी पाहणी करावी, असे बागुल म्हणाले.
भिडे पुलाला भेगा पडल्याने अपघाताचा धोका
By admin | Updated: August 5, 2016 01:05 IST