Join us
Daily Top 2Weekly Top 5

Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:27 IST

Home Decoretion: Indoor Plants in Water' ही सध्याची सर्वात लोकप्रिय आणि देखणी होम-डेकोर संकल्पना आहे, वापरायला सोपी, दिसायला आकर्षक, मात्र आठवणीने घ्या 'ही' काळजी.

आजच्या धावपळीच्या युगात आपण निसर्गापासून दूर होत चाललो आहोत, पण निसर्गाला घराच्या उंबरठ्यात आणण्याची ओढ मात्र कमी झालेली नाही. फ्लॅट संस्कृती आणि वेळेचा अभाव यामुळे अनेकांना 'गार्डनिंग'ची इच्छा असूनही ती पूर्ण करता येत नाही. कधी मातीचा चिखल नको असतो, तर कधी झाडांना पाणी द्यायला वेळ नसतो. पण विचार करा, जर तुमचं घर केवळ पाण्यावर वाढणाऱ्या देखण्या हिरवाईने सजलं तर?

हो, 'Indoor Plants in Water' ही सध्याची सर्वात लोकप्रिय आणि देखणी होम-डेकोर संकल्पना आहे. काचेच्या पारदर्शक बाटल्या, जार आणि त्यात डोलणारी हिरवी पानं घराला एक वेगळीच शांतता देतात.

मातीशिवाय वाढणारी ही रोपं म्हणजे निसर्गाची एक किमयाच! काचेच्या पात्रातून दिसणारी रोपांची पांढरीशुभ्र मुळं आणि वर डोलणारी टवटवीत पानं, हा नजारा कोणत्याही महागड्या शो-पीसपेक्षा अधिक बोलका असतो. चला तर मग, तुमच्या घरातील कोपऱ्यात कोणती 'वॉटर प्लॅन्ट्स' (Water Plants) जागा घेऊ शकतात ते पाहूया:

१. मनी प्लॅन्ट (Pothos): जुना पण तरीही नवा

प्रत्येकाच्या घरात हमखास आढळणारा मनी प्लॅन्ट पाण्यात अतिशय वेगाने वाढतो. काचेच्या निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या बाटल्यांमध्ये हा प्लॅन्ट लावला की घराला एक 'विंटेज' लूक मिळतो.

२. लकी बांबू (Bamboo): शांती आणि समृद्धीचा दूत

बांबूचे छोटे दांडे काचेच्या गोलाकार भांड्यात, पांढऱ्या खड्यांच्या सोबतीने ठेवले की त्या कोपऱ्याचा 'झेन' (Zen) लूक तयार होतो. हे झाड घरासाठी शुभही मानलं जातं.

३. स्पायडर प्लॅन्ट (Spider Plant): शुद्ध हवेचा आधार

हवा शुद्ध करणारं हे झाड पाण्यातही तितक्याच नजाकतीने वाढतं. याची अरुंद आणि लांब पानं एखाद्या कारंज्यासारखी बाहेर झुकलेली दिसतात, जी खिडकीच्या कडेला अतिशय देखणी वाटतात.

४. फिलोडेंड्रॉन (Philodendron) आणि आयव्ही (Ivy):

जर तुम्हाला घराच्या भिंतींवर किंवा शेल्फवरून खाली उतरणारी हिरवळ आवडत असेल, तर हे दोन उत्तम पर्याय आहेत. यांची पानं गडद हिरवी आणि चमकदार असल्याने घराला एक नैसर्गिक 'रिचनेस' मिळतो.

५. किचनमध्ये वापर  (Mint & Lettuce):

फक्त शोभेचीच कशाला, तुम्ही पुदिना किंवा लेट्यूस सारखी पानंही किचनच्या खिडकीत एका काचेच्या पेल्यात वाढवू शकता. ताजी पानं हवी तेव्हा तोडता येतात आणि किचनचा सुगंधही प्रसन्न राहतो.

सजावटीसाठी काही खास टिप्स (Decor Ideas)

पात्रांची निवड: जुन्या वाईनच्या बाटल्या, लोणच्याच्या काचेच्या बरण्या किंवा लॅबमधील टेस्ट ट्यूब्सचा वापर करून तुम्ही 'क्रिएटिव्ह' डेकोर करू शकता.

खड्यांचा वापर: पात्राच्या तळाशी रंगीत गोटे किंवा पांढरे 'पेबल्स' (Pebbles) टाकल्याने झाडाला आधार मिळतो आणि सौंदर्यातही भर पडते.

लाईटिंग: या बाटल्यांच्या आसपास 'फेअरी लाईट्स' किंवा 'वॉर्म व्हाईट' दिवे लावल्यास रात्रीच्या वेळी हे कोपरे एखाद्या स्वप्नवत जगासारखे वाटतात.

काळजी घेताना हे विसरू नका...

पाण्यातली रोपं वाढवणं सोपं आहे, पण त्यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतात:

पाणी बदलणे: आठवड्यातून एकदा पाणी नक्की बदला. यामुळे मुळं सडत नाहीत आणि पाणीही स्वच्छ राहतं.

सूर्यप्रकाश: या रोपांना थेट सूर्यप्रकाश नको असतो, पण खिडकीतून येणारा उजेड त्यांच्या वाढीसाठी आवश्यक आहे.

मुळांची स्वच्छता: पाणी बदलताना मुळांवर साठलेली 'शेवाळ' हलक्या हाताने स्वच्छ करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Transform Your Home with Water Gardening: No Soil Needed!

Web Summary : Embrace water gardening! Grow plants in glass jars, adding tranquility to your home. Low-maintenance options like Money Plant and Bamboo thrive without soil, enhancing your decor with greenery and peace.
टॅग्स :गृह सजावटसुंदर गृहनियोजनबागकाम टिप्स