सार्वजनिक गणेश मंडळांवर कडाडणार ‘दामिनी’

By Admin | Updated: September 4, 2015 22:55 IST2015-09-04T22:55:02+5:302015-09-04T22:55:02+5:30

वीज चोरी रोखण्यासाठी महिलांचे पथक.

'Damini' will hit public Ganesh mandals | सार्वजनिक गणेश मंडळांवर कडाडणार ‘दामिनी’

सार्वजनिक गणेश मंडळांवर कडाडणार ‘दामिनी’

अकोला : सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली असून, या उत्सवादरम्यान मोठय़ा प्रमाणात रोषणाई केली जाते. या उत्सवादरम्यान वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणच्या वतीने दामिनी पथक तयार करण्यात आले असून, या पथकात महिलांचाही समावेश राहणार आहे. राज्यात गणेश उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केल्या जातो. शहरात तसेच गावागावात लाखो सार्वजनिक गणेश मंडळांद्वारे गणेशाची स्थापना केली जाते. या उत्सवादरम्यान आकर्षक देखावे सादर करण्यात येतात. याकरिता हजारो युनिट विजेचा वापर होतो. महावितरणच्या वतीने सर्व गणेश मंडळांना अधिकृत वीजपुरवठा घेण्याचे आवाहन करण्यात येते. दहा दिवसांकरिता विशेष मीटरही देण्यात येते. तसेच गणेश मंडळांसाठी सामान्य ग्राहकांपेक्षा कमी वीजदर आकारण्यात येतो; मात्र तरीही वीज चोरीचे प्रकार होतातच. यावर नियंत्रण मिळविण्याकरिता महावितरणने दामिनी पथकाची स्थापना केली आहे. या पथकामध्ये महिला अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश राहणार आहे. हे पथक सार्वजनिक गणेश मंडळांकडे जाऊन कुठे वीज चोरी होतेय का, याची पाहणी करणार आहे. सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांच्या भेटी घेऊन त्यांना वीज चोरीमुळे होणारे दुष्परिणाम व कायदेशीर कारवाई याबाबत पथक अवगत करणार आहे.

Web Title: 'Damini' will hit public Ganesh mandals