अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 08:50 IST2025-10-05T08:44:33+5:302025-10-05T08:50:21+5:30
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे

अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
मुंबई - महाराष्ट्राच्या उत्तरेकडील किनाऱ्याकडे सरकणारे 'शक्ती' चक्रीवादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकले आहे. यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चक्रीवादळामुळे होणारे नुकसान कमी झाले आहे. परंतु विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय हवामान विभागाने (IMD) इशारा दिला होता की, शक्ती चक्रीवादळाचा ४ ते ७ ऑक्टोबर काळात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गवर प्रभाव पडेल. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांसह या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हे चक्रीवादळ वायव्य आणि ईशान्य अरबी समुद्रावर केंद्रित होते. ते द्वारकेपासून सुमारे ४२० किमी अंतरावर होते. आता ते ओमानच्या मासिराह किनाऱ्याकडे सरकत असल्याचं समोर आले आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. या दरम्यान वादळी वारे आणि उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज असून तशा सूचना हवामान विभागाने मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना दिल्या आहेत. तर सागरी सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. आज हे वादळ ओमानच्या दिशेने सरकले असले तरी सोमवारी मात्र हे चक्रीवादळ वळण घेईल आणि त्याचा प्रवास उलट म्हणजे गुजरातच्या दिशेने सुरू होईल असंही सांगण्यात येत आहे.
६ आणि ७ ऑक्टोबर रोजी कोकणपट्ट्यात मध्यम पाऊस
गेल्या काही वर्षांत अरबी समुद्रात ‘तौकते’ (२०२१) आणि ‘बिपरजॉय’ (२०२३) यांसारखी वादळे आली होती. परंतु बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळांची संख्या कमी आहे. या वादळाला ‘शक्ती’ हे नाव श्रीलंकेने सुचवलेले आहे. उष्ण कटिबंधात चक्रीवादळांना नाव देण्याची पद्धत आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रालगतच्या १३ देशांनी सुचवलेली नावे अशा वादळांना दिली जातात.रविवारी उत्तर भारतात हिमालयाकडे पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बन्स) तयार होईल. या बदलामुळे हवेतला ओलावा वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी कोकणपट्ट्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.