सत्ता टिकवणं आणि पदावर जाणं, यावर सध्याच्या राजकारणाचा फोकस; पंकजा मुंडे नक्की काय म्हणाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 08:01 PM2024-02-22T20:01:44+5:302024-02-22T20:05:11+5:30

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या बहीण प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

Current politics focus on maintaining power says bjp leader Pankaja Munde | सत्ता टिकवणं आणि पदावर जाणं, यावर सध्याच्या राजकारणाचा फोकस; पंकजा मुंडे नक्की काय म्हणाल्या?

सत्ता टिकवणं आणि पदावर जाणं, यावर सध्याच्या राजकारणाचा फोकस; पंकजा मुंडे नक्की काय म्हणाल्या?

BJP Pankaja Munde ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अभूतपूर्व परिस्थिती पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर या दोन्ही पक्षांचा एक गट सत्ताधारी महायुतीच्या आणि दुसरा गट विरोधकांच्या महाविकास आघाडीच्या बाजूने लढताना दिसणार आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघांतील राजकीय गणितेही बदलणार आहेत. लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने संभाव्य उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या बहीण प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून या मोहिमेच्या सुरुवातीलाच एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंकजा यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

"माझ्याकडे कोणतंही पद नाही, मात्र तरीही मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे, मुंडे साहेबांनी मला तुमच्यासाठी सुपूर्द केलं आहे," या पंकजा मुंडे यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत आता तुमच्या मनात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न पंकजा मुंडेंना विचारण्यात आला. त्यावर पंकजा यांनी म्हटलं आहे की, " राजकारणात तुम्ही सध्या बघितलं तर सत्ता टिकवणं, एखाद्या पदावर कोणी जाणं, यावर फोकस आहे. मात्र मुंडे साहेबांच्या राजकारणाचं मूळ काय आहे तर समाजाची तुम्ही अविरत सेवा करा. मग ती पदासकट करा किंवा पद नसतानाही करा, असा माझ्या वक्तव्याचा अर्थ होता," अशी भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली आहे.

धनंजय मुंडेंची मदत होणार?

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाल्याने बीड मतदारसंघात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले मुंडे भाऊ-बहीण आगामी निवडणुकीत एकत्र काम करताना पाहायला मिळतील. धनंजय मुंडे यांचा कितपत फायदा होईल, याबाबत पंकजा मुंडेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, "ते नसतानाही निवडणूक सोपीच झाली होती. कठीण परिस्थिती असली तरी आम्ही विजय मिळवला होता. धनंजय मुंडेंमुळे लोकसभेच्या मतदारांमध्ये अधिकची काही वाढ होईल, असं वाटत नाही. राष्ट्रवादी आता आमच्यासोबत आलीय, त्याचा काय फरक पडतोय, हे बघू आता." 

दरम्यान, "राजकारणात कोणतीही निवडणूक तोंडावर असताना लोकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर द्यावा लागतो. त्यातल्या त्यात लोकांपेक्षाही निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्ते, यंत्रणा, बूथरचना यावर भर द्यावा लागतो. आम्हाला भेटा, असा लोकांचा आग्रह होता. त्यामुळे बूथरचना सांभाळणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी मी जात आहे. मुंडे साहेबांच्या दोन लोकसभा निवडणुका आणि प्रीतमताईंच्या दोन निवडणुकांचा अनुभव माझ्या पाठीशी असल्याने यंदाही मीच हे काम करत आहे," असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

Web Title: Current politics focus on maintaining power says bjp leader Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.