पवार कुटुंबात सध्या उद्भवलेला वाद तात्पुरता; तो घरात बसूनच मिटवला जाऊ शकतो: राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 16:32 IST2020-08-21T16:27:23+5:302020-08-21T16:32:14+5:30
पवार कुटुंबाकडे नेहमीच एक आदर्श कुटुंब म्हणून पहिले जाते...

पवार कुटुंबात सध्या उद्भवलेला वाद तात्पुरता; तो घरात बसूनच मिटवला जाऊ शकतो: राजेश टोपे
पुणे : पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांत राम मंदिर आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विसंगत जाहीर भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे पवार कुटुंबात नवीन वाद उद्भवला आहे. मात्र पवार कुटुंबाकडे नेहमीच एक आदर्श कुटुंब म्हणून पहिले जाते. त्यामुळे या हा निर्माण झालेला वाद तात्पुरत्या स्वरूपाचा असून त्यावर घरात बसूनच मिटवला जाऊ शकतो, या शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पार्थ पवार आणि पवार कुटुंब यांच्यात निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. तसेच पार्थ पवार हे माझे चांगले मित्र असून त्यांच्याशी त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर सविस्तर बोललो आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. टोपे म्हणाले, गेल्या काही दिवसांतील अहवालानुसार कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येत हळूहळू बदल होतो आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. त्यामुळे आगामी काळात पुण्याची स्थिती नक्की बदलेल असा विश्वास आहे.त्याचप्रमाणे चाचण्यांत वाढ, ऑक्सिजन,आयसीयू खाटा यांची उपलब्धता वाढवण्यावर आमचा भर आहे. तसेच जे खासगी रुग्णालये कोरोना बाधितांच्या उपचारासाठी अवास्तव बिले लादत आहे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यासाठी विशेष प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जास्तीचे बिले स्वीकारणाऱ्या रुग्णालयांवर आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे पूर्ण आदेश देण्यात आले आहे.
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांवर कोरोनाचे संकट असल्याने आपण जबाबदारीपूर्वक वागणे गरजेचे आहे. त्यामुळेच यावर्षी सध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करत प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने जे काही नियम गणेश उत्सव काळासाठी तयार केले आहे त्याचे कटाक्षाने पालन करण्यात यावे. मी पुणेकरांच्या गणेश उत्सवाशी जोडल्या गेलेल्या भावना समजू शकतो कोरोना संकटामुळे आपल्या नेहमीच्या उत्साहाला मुरड घालणे गरजेचे आहे,असे टोपे यांनी सांगितले.
सुशांतसिंह म्हणाले, सुशांत सिंग प्रकरणी एक गोष्ट निश्चितच सांगू शकतो ती म्हणजे मुंबई पोलिसांनी याप्रकरणाचा प्रकारे तपस केला. पण आता हे प्रकरण न्यायालयात आहे. आणि आपला देश न्याय संस्थेला प्रमाण मानतो.त्यामुळे सर्वोच्च न्यालयालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर असून यापुढे राज्य सरकारकडून सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्यात येईल.