मराठीच्या मुद्द्यावर मनसे-उद्धवसेनेचा एकत्रित विजयी मेळावा वरळी डोम येथे झाल्यानंतर आता मनसे आणि शिंदेसेनेने सावध पवित्रा घेतला आहे. मनसे आणि उद्धवसेनेबाबतच्या संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना आपल्याशी चर्चा केल्याशिवाय युतीबाबत विधाने करू नयेत, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, राज ठाकरे यांच्याविरोधात न बोलण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदेसेनेतील प्रवक्ते व नेत्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
युतीबाबत विधाने करू नका : राज ठाकरे
मराठीच्या विजयी मेळाव्यानंतर, आता महापालिका निवडणुकीसाठी युती होणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यातून संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. नुकत्याच झालेल्या विजयी मेळाव्यानंतर मनसे व उद्धवसेनेच्या युतीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हिंदीला विरोध करण्यासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आले असले तरी राज ठाकरे यांनी युतीबाबत सकारात्मक अथवा नकारात्मक स्पष्ट विधान केले नाही; त्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून चुकीचा संदेश जाऊन संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी राज यांनी पक्ष नेत्यांना युतीबद्दल विधान करू नये, अशा सूचना दिल्याचे कळते.
राज ठाकरेंवरील टीका टाळा : शिंदेसेना
राज ठाकरे आमच्याबद्दल काहीही बोलले नाहीत; त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल बोलणार नसल्याचे शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. राज यांच्याविरोधात बोलण्याचा विषय येतो कुठे? ‘ना कुठला पक्ष, ना कुठला झेंडा’ अशी त्यांची भूमिका होती; मात्र उद्धव ठाकरे यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी भाषण केले. उद्धव हे हरलेले दिसून आल्याची टीका म्हस्के यांनी केली. राज यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही; मात्र उद्धव यांच्याबद्दल आम्ही बोलत राहू, असेही त्यांनी सांगितले. उद्धव यांनी अतिशय गलिच्छ भाषण करून उसने अवसान आणले. महाराष्ट्र, मराठी माणसांवर अन्याय होत असल्याचे भडकावणारे भाषण करून निवडणुका लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.