Coronavirus : वांद्र्यातल्या गर्दीवर शरद पवारांचं भाष्य, म्हणाले ती घटना दुर्दैवीच; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 12:34 PM2020-04-15T12:34:02+5:302020-04-15T12:42:27+5:30

कोरोनाचा परिणाम दोन वर्ष कायम राहणार असून, भविष्यात बेरोजगारीचं प्रमाण वाढणार असल्याचे संकेत पवारांनी दिले आहे. 

Coronavirus : Sharad Pawar's comment on the crowd in the bandra, incident was unfortunate vrd | Coronavirus : वांद्र्यातल्या गर्दीवर शरद पवारांचं भाष्य, म्हणाले ती घटना दुर्दैवीच; पण...

Coronavirus : वांद्र्यातल्या गर्दीवर शरद पवारांचं भाष्य, म्हणाले ती घटना दुर्दैवीच; पण...

Next

मुंबई- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारनं ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्राबरोबर राज्य सरकार समन्वय साधून कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु राज्यातलं कोरोनाग्रस्तांचं प्रमाण दिवसागणिक वाढतच चाललं आहे. त्यात काल वांद्र्यात परराज्यातील मजूर मोठ्या प्रमाणात जमले होते. या सर्व घडामोडींवर शरद पवारांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला आहे. कोरोनाचा परिणाम दोन वर्षेही कायम राहणार असून, भविष्यात बेरोजगारीचं प्रमाण वाढणार असल्याचे संकेत पवारांनी दिले आहे. 

भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चिंताजनक आहे. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असला तरी त्यांच्या प्रवासाची सोय करू शकत नाही. मात्र त्यांच्या जेवणाची खबरदारी सरकार, सेवाभावी संस्थांनी घेतली आहे. ज्यामुळे त्यांची उपासमार होणार नाही, असंही पवार म्हणाले आहेत. उद्योग जगतानं कामगारांची काळजी घेतली पाहिजे. 3 मेपर्यंत संपूर्ण देशाने सरकारला सहकार्य करायचं आहे. सरकार धीराने काम करत आहे, योग्य नियोजन करून कोरोनाचा सामना करणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाची बाधा कमी आहे.

जी उपाययोजना करायची आहे, ती सगळी पावलं टाकली जात आहेत, वैद्यकीय खबरदारी घेतली जातेय, अन्न-धान्याची पूर्तता, कष्टकरी-कामगार वर्ग यांची काळजी घेतली जात आहे. वांद्रे स्टेशनजवळ घडलेला प्रसंग दुर्दैवी आहे, कुणीतरी रेल्वेबाबत अफवा पसरवली, डिस्टन्सिंगच्या सूचना पाळल्या गेल्या नाहीत, जे काल घडलं, ते यापुढे घडू नये यासाठी खबरदारी घ्यायला हवी, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. राजकीय पक्षांना आवाहन करतो की, राजकारण लोकशाहीत चालतच असतं, पण ही वेळ राजकारणाची नाही, देशावर गंभीर संकट आहे अन् प्रशासनावर ताण आहे, जे एकत्रितपणे काम करत आहेत, त्यांना सहकार्य करा, पक्ष विसरून सरकारला मदत करा, असं आवाहनही पवारांनी केलं आहे.   

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योग बंद आहेत. अशातच कामगारांची जबाबदारी आणि वाढणारं कर्ज आणि शून्य उत्पादन अशा संकटात सर्वच क्षेत्र आहेत. त्यामुळे राज्यावर आर्थिक संकट येणार आहे. एवढचं नाहीतर शेतकऱ्यांवरही शेतीचा माल तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या काळात बेरोजगारी वाढणार आहे. कोरोनाचे परिणामही एक ते दोन वर्षांपर्यंत जाणवणार आहेत.' कोरोना संकटाचा अर्थकारणावरही मोठा परिणाम होणार आहे. याबाबत आतापासूनच काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. तसेच काही उपाययोजनाही करणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. अशातच कोरोनाच्या संकटाशी संयमानं मुकाबला करणं आवश्यक आहे.' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

Read in English

Web Title: Coronavirus : Sharad Pawar's comment on the crowd in the bandra, incident was unfortunate vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.