Coronavirus News former cm Ashok Chavan Tested Corona Positive kkg | Coronavirus News: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण

Coronavirus News: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. त्यातच आता ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांना लवकरच मुंबईत उपचारांसाठी आणलं जाणार आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आजच ५० हजारांच्या पुढे गेला आहे. 

ठाकरे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. चव्हाण यांच्याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची बाधा झाली होती. सुरुवातीला आव्हाड यांनी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर ठाण्यातल्या रुग्णालयात उपचार झाले. आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वीच आव्हाड कोरोनावर मात करून घरी परतले. 

त्याआधी एप्रिलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याजवळ असलेल्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली होती. चहाच्या टपरी जवळूनच मातोश्री परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची ये-जा असते. त्यामुळे चहा विक्रेत्याला कोरोनाची बाधा झाल्याचं वृत्त समोर येताच जवळपास शंभरपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि एसआरपीएफच्या जवानांना क्वारंटीन करण्यात आलं.

राज्यातील कोरोनाचा वाढता विळखा; रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी तब्बल ३ हजार कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला आहे. एकट्या मुंबईत कोरोनाचे ३० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. 

आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे ३ हजार ४१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५० हजार २३१ वर पोहोचला. राजधानी मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १ हजार ७२५ रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोना बाधितांची संख्या ३० हजार ५४२ वर गेली. २४ तासांमध्ये मुंबईत ३८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत ९८८ कोरोना बाधित मृत्यूमुखी पडले आहेत.
 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus News former cm Ashok Chavan Tested Corona Positive kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.