एवढा उशीर का केला?... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिडले; थेट शरद पवारांशीच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:54 AM2020-04-10T11:54:36+5:302020-04-10T11:57:12+5:30

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर जनतेला पोलिसांच्या दंडुक्यांचा धाकही दाखवला होता. मात्र, त्यांच्याच खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांच्या महाबळेश्वर दौऱ्याला हिरवा कंदील दिला.

CoronaVirus Lockdown: CM Uddhav Thackeray angry as the action against principal secretary was delayed | एवढा उशीर का केला?... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिडले; थेट शरद पवारांशीच बोलले!

एवढा उशीर का केला?... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिडले; थेट शरद पवारांशीच बोलले!

googlenewsNext
ठळक मुद्देगृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना आज सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.वाधवान कुटुंबाला लॉकडाऊनदरम्यान महाबळेश्वरला जाण्याची लेखी परवानगी त्यांनी दिली होती.त्यांच्यावरील कारवाईला उशीर झाल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यातच नव्हे, तर देशभरात लॉकडाऊन सुरू असताना, येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबाचे 23 सदस्य महाबळेश्वरला पोहोचल्याची बातमी समोर आली आणि एकच खळबळ उडाली होती. त्यांना ही परवानगी कुणी दिली, का दिली, कशी काय दिली, असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आणि राज्य सरकार संशयाच्या फेऱ्यात आलं. चौकशीअंती, गृह विभागाचे प्रधान सचिव, आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी ही परवानगी दिल्याचं स्पष्ट झालं. त्यांना आज सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं असलं, तरी या कारवाईला उशीर झाल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही फोनवरून चर्चा केल्याचंही समजतं. 

वाधवान कुटुंबियांना दिलेलं शिफारसपत्र भोवलं?; अनिल देशमुखांची गृह खात्याच्या सचिवांवर कारवाई

‘पेज थ्री’ इमेज असणारे अधिकारी म्हणून अमिताभ गुप्ता यांच्याविषयी चर्चा होत असते. दिवाण बिल्डरशी संबंधित बड्या लोकांना, लॉकडाऊनदरम्यान महाबळेश्वरला जाण्याची लेखी परवानगी त्यांनीच दिल्याचं कळताच उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नोंदवली होती. त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं गरजेचं होतं. पण, त्याला उशीर केला गेला. स्वाभाविकच, सरकारच्या भूमिकेबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे उद्विग्न झाल्याचं कळतं. 

राज्यातून कोणालाही बाहेर जायचे असेल किंवा जिल्हा बदलायचा असेल तर त्यासाठी परवानगी देण्याचे अधिकार पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांना आहेत, याची पूर्ण कल्पना अमिताभ गुप्ता यांना होती. तरीदेखील त्यांनी स्वतःच्या अधिकारात वाधवान कुटुंबीयांना परवानगी दिली. ती देत असताना त्यात त्यांनी ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत असा उल्लेख केला. देश भयंकर संकटात असताना एखादा अधिकारी आपले ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत म्हणून आपल्या अधिकाराचा वापर करत चुकीची सवलत देत असेल तर तो अक्षम्य गुन्हा ठरू शकतो. एवढ्या एका कारणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अमिताभ गुप्ता यांचे निलंबन करू शकतात. मात्र, अधिकारी आणि नेते यांच्या संगनमताची अनेक उदाहरणं आहेत. तशा संगनमतातूनच तर हा प्रकार झाला नाही ना, अशीही कुजबूज ऐकू येतेय.

वाधवान कुटुंबियांना दिलेल्या पत्रामागे 'या' बड्या नेत्याचा हात; भाजपाचा घणाघात

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं पंतप्रधानांपासून सगळेच नेते सांगत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला वारंवार हे आवाहन केलंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तर जनतेला पोलिसांच्या दंडुक्यांचा धाकही दाखवला होता. मात्र, त्यांच्याच खात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांच्या महाबळेश्वर दौऱ्याला हिरवा कंदील दिला. वाधवान बंधू आपल्या 5 आलिशान कारमधून 23 कुटुंबीयांना घेऊन महाबळेश्वरला पोहोचले. तातडीच्या कौटुंबिक कामासाठी महाबळेश्वरला पोहोचता येईल, यासाठी सहकार्य करावं असं गृहखात्यानं दिलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.  

Video : खळबळजनक! लॉकडाऊनचे उल्लंघन, वाधवान कुटुंबीय पोचले महाबळेश्वरला
 

उद्धव ठाकरे निलंबनाची कारवाई करणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई करू शकतात. तो अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. एखाद्या अधिकाऱ्यांला निलंबित केल्यानंतर कारणांसहित याची माहिती मुख्यमंत्री केंद्र सरकारला देतात. केंद्राकडून ती माहिती युपीएससीकडे पाठवली जाते.  त्यामुळे आता, वाधवान कुटुंबीयांना स्पेशल ट्रिटमेंट देणाऱ्या अमिताभ गुप्ता यांचे निलंबन करून केंद्राला तसे कळवावे असा दबाव उद्धव ठाकरेंवर वाढतोय. ते आता कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
 

Read in English

Web Title: CoronaVirus Lockdown: CM Uddhav Thackeray angry as the action against principal secretary was delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.