BJP leader Kirit Somaiya said that NCP President Sharad Pawar had a hand in his letter of the Wadhavan family mac | वाधवान कुटुंबियांना दिलेल्या पत्रामागे 'या' बड्या नेत्याचा हात; भाजपाचा घणाघात

वाधवान कुटुंबियांना दिलेल्या पत्रामागे 'या' बड्या नेत्याचा हात; भाजपाचा घणाघात

मुंबई: लॉकडाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबीय गुरुवारी महाबळेश्वरला पोचल्याने एकाच खळबळ माजली होती. महाबळेश्वरला जाण्यासाठी त्यांना गृह मंत्रालयाच्या विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र परवानगी म्हणून मिळाल्याने आणखीच चर्चेला उधाण आले आहे. वाधवान कुटुंबियांचा हा सर्व प्रकार समोर आल्यांनतर अमिताभ गुप्ता यांच्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई केली आहे. परंतु या कारवाईनंतर देखील भाजपाने सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी तर आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केले आहे. शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून महाबळेश्वरला जाण्यासाठीचं परवानगी पत्र मिळणं अशक्य असल्याचे सांगितले आहे. शरद पवारांचा या सर्व प्रकरणामध्ये हात असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे आता शरद पवार याबाबत प्रत्युत्तर देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हणाले की, वाधवान कुटुंबीयांना लॉकडाऊनमध्ये प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना  त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. कायदा सर्वांसाठी समान असल्याची माहिती देखील यावेळी अनिल देशमुख यांनी दिली.

वाधवान कुटुंब  महाबळेश्वरमध्ये पोहचल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी त्यांना पाहिले. यानंतर रहिवाशांनी या संबंधित माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सांगितली. यानंतर वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
 

कोणाच्या आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? : फडणवीस

राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांचं पत्र घेऊन वाधवान कुटुंब लॉकडाऊनमध्येही मुंबईहून महाबळेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर सरकारवर विशेषत: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संदर्भात प्रश्न उपस्थित करत उत्तर देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात बलाढ्य आणि श्रीमंताना लॉकडाऊन नाही का? पोलिसांच्या अधिकृत परवानगीने काही जण महाबळेश्वरमध्ये सुट्टीला गेले आहेत. एवढ्या मोठ्या चुकीचे काय परिणाम होतील माहित असूनही वरिष्ठ आयपीएस अधिकारी असं कृत्य करेल, हे शक्य वाटत नाही. कोणाच्या आशीर्वादाने हे घडलं? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्पष्टीकरणं देणं गरजेचं आहे असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. 

Read in English

Web Title: BJP leader Kirit Somaiya said that NCP President Sharad Pawar had a hand in his letter of the Wadhavan family mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.