coronavirus : लग्नाची वरात, बाईकवरून घरात; लॉकडाऊनमध्येच संपन्न झाला हटके विवाहसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 15:08 IST2020-04-19T15:03:11+5:302020-04-19T15:08:28+5:30
लॉकडाऊनमुळे काही जणांचे ठरलेले विवाहसोहळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहेत. दरम्यान, या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत अनेकजण मंगलकार्य घडवून आणत आहेत.

coronavirus : लग्नाची वरात, बाईकवरून घरात; लॉकडाऊनमध्येच संपन्न झाला हटके विवाहसोहळा
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - ऐन लगिनसराईच्या मोसमात कोरोनाने धुमाकूळ घातल्याने अनेक विवाहेच्छुकांचे विवाह रखडले आहेत, तर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे काही जणांचे ठरलेले विवाहसोहळे अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडले आहेत. दरम्यान, या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढत अनेकजण मंगलकार्य घडवून आणत आहेत. असाच एक जरा हटके विवाह सोहळा नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीजवळीक एका गावात संपन्न झाला.
वराती, बँडबाजा, पै पाहुणे, मानपान, जेवणावळी असला पारंपरिक लग्नातील कुठलाच थाटमाट न करता हा विवाह सोहळा पार पडला. वधू-वर, भटजी आणि वराचा एक मित्र अशा केवळ चार जणांच्या उपस्थितीत हे शुभमंगल संपन्न झाले. विशेष बाब म्हणजे या विवाह सोहळ्याला वधु-वरांचे आई-वडीलसुद्धा उपस्थित नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार इन्सुली गावातील स्वप्निल नाईक याचा विवाह सातार्डा येथील रसिका पेडणेकर हिच्यासोबत काही दिवसांपूर्वी ठरला होता. मात्र त्याचदरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्याने लग्नात विघ्न आले होते. अखेरीस या परिस्थितीतून मार्ग काढत वधु-वराकडच्या मंडळींनी विवाह साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरवले. तसेच या विवाहसोहळ्यासाठी सावंतवाडीचे तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांची परवानगी घेण्यात आली. शासनाच्या नियमांचे पालन करून विवाहसोहळा पार पडल्यास आपली काहीच हरकत नसेल, अशी सूचना तहसीलदारांनी केली होती.
अखेरीस वधू-वर, विवाह लावून देणारे भटजी आणि वराचा एक मित्र अशा चार जणांच्या उपस्थितीत हा विवाह संपन्न झाला. त्यानंतर वर वधूला घेऊन बाईकवरूनच वरात काढत घर गाठले.