Video: बाहेर कोरोना आहे पप्पा...! पोलिसाच्या चिमुकल्याची विनवणी पाहून डोळ्यात अश्रू तरळतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 17:30 IST2020-03-25T17:03:40+5:302020-03-25T17:30:43+5:30
corona virus mumbai, pune लॉकडाऊनमुळे अख्खा देश घरात बंद असताना सण वार कधीच मिळत नसलेल्या पोलिसांना मात्र रस्त्यावर थांबावे लागत आहे.

Video: बाहेर कोरोना आहे पप्पा...! पोलिसाच्या चिमुकल्याची विनवणी पाहून डोळ्यात अश्रू तरळतील
मुंबई : जगभरात कोरोनामुळे पोलीस, लष्कराला रस्त्यावर उतरावे लागले आहे. डॉक्टर, नर्स यांच्याबरोबर पोलीसही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. रस्ते निर्मनुष्य ठेवण्याबरोबरच कोरोनाच्या रुग्णांना शोधून आणण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे.
लॉकडाऊनमुळे अख्खा देश घरात बंद असताना सण वार कधीच मिळत नसलेल्या पोलिसांना मात्र रस्त्यावर थांबावे लागत आहे. एका पोलिसाच्या चिमुकल्याने त्याला बाहेर कोरोना आहे ना पप्पा म्हणत हंबरडा फोडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांना नेहमीच सणांवेळी घरापासून लांब रहावे लागते. कोणतीही आपत्ती आली, संकटे आली की रात्रंदिवस पोलिसांना ड्युटी करावीच लागते. महाराष्ट्रासह देशात कोरोनामुळे लॉ़कडाऊनची स्थिती आहे. यामुळे पोलिसांना फोन आला की लगेच कामावर जावे लागत आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ कुठला आहे हे जरी समजलेले नसले तरीही या चिमुकल्याने पोलीस बापाला गणवेश घालताना पाहून घातलेली साद खूप भावनिक करणारी आहे.
पोलीस बाबा त्याला सजावत आहे. साहेबांचा फोन आला होता मला, असे सांगताच ''बाहेर नको जाऊ, बाहेर कोरोना आहे पप्पा'' अशी आर्त विनवणी करत आहे. यावर पोलिसाने त्याला 'लगेच आलो, दोनच मिनिटांत जाऊन येतो', असे समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा चिमुकला काही ऐकायचे नाव घेत नव्हता. मुलाला दोन मिनिटांत येतो सांगताना त्या पोलिसाची काय अवस्था झाली असेल विचार न केलेलाच बरा.
बाहेर कोरोना आहे पप्पा...!
— faijal khan (@faijalkhantroll) March 25, 2020
Can't stop my emotions 😥😓 #StayHomeIndia#StayAtHomeSaveLives#StopTheSpreadOfCoronapic.twitter.com/m8Nx2BaBkf
पोलिसांची ड्युटी तशी न सांगता येणारी. त्यातच कोरोना व्हायरसमुळे लागलेला बंदोबस्त कुठे जावे लागेल कल्पनाही नाही. अशातच तो पोलीस मुलाला काळजावर दगड ठेवल्यासारखा दोनच मिनिटांत येतो, असे आश्वासन देत आहे. अशीच स्थिती देशातील अनेक पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य अधिकाऱ्यांची झालेली असणार हे निश्चित.