coronavirus 50 persons returned from nizamuddin markaz should surrender says home minister anil deshmukh kkg | CoronaVirus: 'त्या' ५० जणांनी सरेंडर करावं; अन्यथा आम्ही कारवाई करू; गृहमंत्र्यांचा इशारा

CoronaVirus: 'त्या' ५० जणांनी सरेंडर करावं; अन्यथा आम्ही कारवाई करू; गृहमंत्र्यांचा इशारा

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा वेगानं वाढला आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमधील मरकजमध्ये सहभागी झालेले १४०० तबलिगी राज्यात आल्यानं प्रशासनाची झोप उडाली. मात्र यातील साडे तेराशे जणांपर्यंत पोहोचण्यात प्रशासनाला यश आलं. पण अजूनही ५० जणांचा ठावठिकाणा समजलेला नाही. या ५० जणांनी लवकरात लवकर स्वत:हून पुढे यावं आणि कोरोना चाचणी करून घ्याव्या. अन्यथा आम्ही योग्य कारवाई करू, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

'दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेले १४०० जण राज्यात आले. यातील साडे तेराशे तबलिगींशी संपर्क साधण्यात यश आलंय. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत. मात्र अजूनही ५० जण नॉट रिचेबल आहेत. त्यांनी फोन बंद केले आहेत. या व्यक्तींनी स्वत:हून पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावं. आम्ही त्यांच्या आवश्यक चाचण्या करू. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास आमचं प्राधान्य आहे,' असं देशमुख यांनी सांगितलं. लपून बसलेल्या ५० तबलिगींनी शासनाला सहकार्य करावं. अन्यथा आम्ही त्यांना शोधून काढू आणि कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला. 

वसईत १५, १६ मार्चला तबलिगींचा मोठा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाला राज्य सरकारनं परवानगीदेखील दिली होती. तबलिगींनी कार्यक्रमाची पूर्ण तयारी केली होती. या कार्यक्रमाला ५० हजार जण उपस्थित राहणार होते. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात आम्ही त्यांना दिलेली परवानगी नाकारली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता, असं देशमुख म्हणाले.

राज्यात लॉकडाऊन असतानाही अनेक जण किराणा माल घेण्याच्या नावाखाली फिरत आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करायला जातो असं सांगून अनेक जण उगाच दुचाकी, चारचाकी घेऊन फिरत असल्याचं लक्षात आलं आहे. अशा व्यक्तींची वाहनं जप्त केली जातील आणि पोलिसांनी वाहनं जप्त केली की त्यांचं पुढे काय होतं, हे तुम्हाला माहितीच आहे, अशा शब्दांत देशमुख यांनी काम नसताना बाहेर भटकणाऱ्यांना इशारा दिला. वैद्यकीय कर्मचारी, पोलीस सध्या अतिशय कठीण परिस्थितीत काम करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून ते झटत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असंदेखील ते म्हणाले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus 50 persons returned from nizamuddin markaz should surrender says home minister anil deshmukh kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.