Corona virus : Jalneti could be the savier in the growing outbreak of Corona virus. Dr. Dhananjay Kelkar | Corona virus : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावात ‘जलनेती’ठरु शकते तारणहार : डॉ. धनंजय केळकर 

Corona virus : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावात ‘जलनेती’ठरु शकते तारणहार : डॉ. धनंजय केळकर 

ठळक मुद्देतीन हजार डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांवर मागील तीन महिन्यांपासून अभ्यास सुरू जलनेतीवर आणखी तीन महिने अभ्यास सुरू राहील. त्यानंतर हे संशोधन प्रसिध्द केले जाणार

पुणे : जगभरात कोरोना विषाणुला रोखण्यासाठी औषधे व लसींच्या चाचण्या सुरू असताना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी योगामधील जलनेतीमुळे कोरोना विषाणुला दुर ठेवु शकत असल्याचा दावा केला आहे. रुग्णालयामध्ये मागील तीन महिन्यांपासून नियमितपणे जलनेती करणाऱ्या ६०० हून अधिक डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. जलनेती केल्याने कोरोनाचा संसर्ग होणारच नाही, असा आमचा दावा नसला तरी संसर्गाची शक्यता कमी होते, असे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणुचा फैलाव वाढू लागल्यानंतर जगभरातील आरोग्य क्षेत्रामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. अनेक औषधांंच्या चाचण्या घेऊन कोरोनाची लक्षणे कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कोरोना दुर ठेवणाऱ्या लसींचे प्रयोगही सुरू आहेत. पण अद्याप एकही लस उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्याचवेळी डॉ. केळकर यांनी योगातील एक पारंपरिक क्रिया असलेल्या 'जलनेती' चा अभ्यास सुरू केला आहे. रुग्णालयातील सुमारे तीन हजार डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांवर मागील तीन महिन्यांपासून हा अभ्यास सुरू आहे. या अभ्यासातून सकारात्मक निष्कर्षही मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.
याविषयी ‘लोकमत’ ला माहिती देताना डॉ. केळकर म्हणाले, मी मागील साडे चार वर्षांपासून जलनेती करत आहे. तेव्हापासून कधीही संसर्ग होऊन सर्दी किंवा फ्लुची लक्षणे आढळून आली नाहीत. त्यापूर्वी त्रास होत असायचा. कोरोनाचा संसर्गही प्रामुख्याने नाकावाटे होतो. त्यामुळे आपल्याकडे कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रुग्णालयातही जलनेतीचा अभ्यास सुरू करण्यात आला. तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणारे रुग्णालयातील सुमारे १२०० डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांपैकी ६०० जण दिवसातून दोनदा जलनेती करत आहेत. हे करताना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, हातांची स्वच्छता याची दक्षता घेतली जाते. या कालावधीत त्यातील एकालाही कोरोनाचा फ्लुची किंवा कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. जलनेती न करणारे अन्य ६०० जण तसेच रुग्णालयातील इतर १८०० जणांपैकी २२ जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती. या सर्वांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. हा तुलनात्मक अभ्यास पुढील आणखी तीन महिने हा अभ्यास सुरू राहील. त्यानंतर हे संशोधन प्रसिध्द केले जाणार आहे, असे डॉ. केळकर यांनी स्पष्ट केले.
-----------------
जलनेती कोणीही करू शकते
जलनितीमुळे नाकामध्ये सतत ओलावा राहतो. नाक स्वच्छ होऊन विषाणुंचा भार (व्हायरल लोड) कमी होतो. नाक कोरडे पडले तर  संसर्गाची शक्यता अधिक वाढते. नाकाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जलनिती केली जाते. बायपास, अस्थमा किंवा अन्य आजार असलेले तसेच जलनितीचे पात्र व्यवस्थितपणे धरू शकणारे कोणीही जलनेती करू शकते. माझे ९२ वर्षांचे वडील दीड महिन्यांपासून करत आहेत, अशी माहिती डॉ. केळकर यांनी दिली.
--------------
... तर ठरेल गेमचेंजर
पुढील तीन महिन्यांतील निष्कर्षामधून जलनेतीचा प्रभावीपणे परिणाम होत असल्याचे दिसून आल्यास हे महत्वपूर्ण संशोधन ठरेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असा आशावाद डॉ. केळकर यांनी व्यक्त केला. तसेच जलनितीचे तोटे नसल्याने ज्यांना शक्य आहे ते आतापासून करू शकतील, या उद्देशाने ही माहिती दिल्याचे त्यांनी नमुद केले.
----------------

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus : Jalneti could be the savier in the growing outbreak of Corona virus. Dr. Dhananjay Kelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.