“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:48 IST2025-10-08T15:45:42+5:302025-10-08T15:48:56+5:30
Congress Vijay Wadettiwar: राज्यातील बळीराजाचा विसर केंद्र सरकारला पडता कामा नये. पंतप्रधान मोदी यांनी मदत जाहीर करून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar: देशाचे पंतप्रधान हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नवी मुंबई विमानतळ, मेट्रो प्रकल्प असे विविध प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन सोहळे पार पाडले जात आहेत. पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असताना शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी ,अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले की नवी मुंबई विमानतळाचे काम अपूर्ण आहे, डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाण होणार आहेत अशा वेळी अपूर्ण राहिलेल्या कामाचे उद्घाटन हे फक्त श्रेय घेण्यासाठी सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवण्यासाठी इव्हेंट जोरात सुरू आहे पण ते करताना राज्यातील बळीराजाचा विसर केंद्र सरकारला पडता कामा नये. पंतप्रधान महाराष्ट्रात येत असताना शेतकऱ्यांना देखील भरभरून दिले पाहिजे. पंतप्रधान मोदी यांनी मदत जाहीर करून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
ओबीसींना वारंवार कोणी टार्गेट करत असेल तर...
सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समजात असुरक्षिततेची भूमिका आहे यातून काही आत्महत्या झाल्या आहेत. पण या आत्महत्येचे खरे कारण शोधण्यासाठी पोलिस तत्परत्तेने काम करत आहे, यातून सरकारचे ओबीसी समाजावर किती प्रेम आहे,हे स्पष्ट होत आहे. मुळात ओबीसी समाजात आरक्षण प्रश्नावर वेदना आहे, त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे हे समजून घेतले पाहिजे. ओबीसींना वारंवार कोणी टार्गेट करत असेल तर आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली.
दरम्यान, १० ऑक्टोबर रोजी नागपूर इथे ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा होणार आहे. हा मोर्चा सकल ओबीसी संघटनांचा आहे या मोर्च्यात जे कोणी सहभागी होतील त्यांचे स्वागत करू, असे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.