“दोन्ही NCP विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतीकडून मध्यस्थी, एक अट अन्...”; कुणाचा दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:48 IST2026-02-03T12:44:59+5:302026-02-03T12:48:34+5:30
Congress Vijay Wadettiwar News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

“दोन्ही NCP विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतीकडून मध्यस्थी, एक अट अन्...”; कुणाचा दावा?
Congress Vijay Wadettiwar News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. विरोधकांनीही या प्रकरणात उडी घेतली असून, राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. यातच शरद पवार यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असून, ते बारामतीला जात असल्याचे म्हटले जात आहे. यावरून काही तर्क-वितर्क सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. विशेषतः 'विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार?' याबाबत स्पष्टता आवश्यक असून, त्याशिवाय या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. राष्ट्रवादीची भूमिका अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आधीच निश्चित झालेली असून, त्याच मार्गाने वाटचाल करणे, हे आमचे कर्तव्य आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत मोठा दावा केला आहे.
दोन्ही NCP विलीनिकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतीकडून मध्यस्थी
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, राष्ट्रवादीतील विलीनिकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतीकडून मध्यस्थी करण्यात आली. एनडीएला पाठिंबा देण्याची एक अट होती. त्यावर एकमत बाकी होते. काही दिवसांपूर्वी एक उद्योगपती येऊन गेले. त्यांनी या विलीनिकरणासाठी समेट घडवून आणली. हे विलीनीकरण घडवून आणताना एनडीला पाठिंबा देण्याची अट घालण्यात आली. गुजरातचे आणि देशातील एक मोठे उद्योगपती यांनी त्यासाठी मध्यस्थी केली. एनडीएला पाठिंबा देण्यावरून ही प्रक्रिया थांबली आहे, असा मोठा दावा वडेट्टीवार यांनी केला.
दरम्यान, चार महिन्यांपासून विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. विलीनीकरणाची घोषणा १२ तारखेला होणार होती. या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे या प्रक्रियेला खंड पडला. या चर्चामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी नव्हतो. अजितदादा, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे सातत्याने यात होते. दोन्ही पक्षांमध्ये एकत्र काम करण्याबाबत एकमत होते, असे शरद पवार यांनी नमूद केले.