“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:55 IST2025-11-13T14:52:57+5:302025-11-13T14:55:18+5:30
Congress Vijay Wadettiwar News: येत्या काळात महायुतीत सगळ्यात पहिला आघात अजित पवार यांच्या पक्षावर होईल आणि सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर आणली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar News: पार्थ पवार प्रकरणी शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्थ पवारांना वाचवू शकत नाहीत. थेट मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतल्याशिवाय पार्थ पवार वाचू शकत नाही. 'वर्षा' बंगल्यावर जी बैठक झाली त्यात अजित पवारांनी संतप्त भूमिका घेतली होती. यात त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचीही भाषा केली, असा दावा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दावा केला आहे. यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.
पुण्याच्या जमीन घोटाळ्यात पार्थ पवार जबाबदार आहे.पण निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार पक्षाचा घोटाळा बाहेर काढून त्या पक्षाची कोंडी केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात या पक्षाने भाजपा पूरक भूमिका घ्यावी या हिशोबाने अजित पवार यांचा पक्ष कमजोर करण्याचा डाव दिसत आहे. येत्या काळात महायुतीत सगळ्यात पहिला आघात अजित पवार यांच्या पक्षावर होईल आणि त्यांना सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर आणली जाईल, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
निवडणुकीत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट आहे. हा अर्ज ऑनलाइन स्वीकारताना अडचणी उभ्या राहत आहेत त्यामुळे हे अर्ज प्रत्यक्षात स्वीकारावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेसने राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांचा अर्ज हा २० पानी असून त्यात गेल्या निवडणुकीत किती मते मिळाली,किती खर्च केला अशी माहिती मागितली आहे. ही माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असतानाही मागवली आहे. यातही अर्ज भरताना प्रक्रिया किचकट आहे, शेवटच्या क्षणी विरोधकांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही अशी स्थिती निर्माण होऊ शकते.म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात स्वीकारण्याची विनंती केली असल्याचे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत विविध ठिकाणी होणाऱ्या आघाडीचे चित्र स्पष्ट होईल, अस ही वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, पुण्यातील प्रकरणाबाबत भाजपाला माहिती होती, हे सर्व उघड झाल्यानंतर अजित पवार अडचणीत येतील हा त्यांचा उद्देश होता. ही मोडस ओपरेंडी आहे. आता अजित दादांची फाईल तयार केली आहे. उद्या जर अजित पवारांनी काही केले तर एक मिनिटांत पार्थ पवारांना अटक होऊ शकते. हे भाजपाचे षडयंत्र आहे. त्यातूनच पार्थ पवार प्रकरण बाहेर आले. वर्षावरील बैठकीत जे घडले त्यावर मला बोलायला वेळ मिळाला नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे, त्यादिवशी जी बैठक झाली, त्यात अजित पवारांनी रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून सरकारला पाठिंबा देऊ इथपर्यंतची भूमिका घेतल्याचे आमच्या कानावर आले आहे. खरे खोटे बाहेर येईल. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांना आणि पार्थ पवारांना वाचवले जात आहे, असे मला वाटते असे दानवेंनी सांगितले.