Congress Manikrao Thakare meet Raj Thackeray on Krushnakunj | काँग्रेसचे माणिकराव ठाकरे 'राज' गडावर; आघाडीसाठी प्रयत्नशील?
काँग्रेसचे माणिकराव ठाकरे 'राज' गडावर; आघाडीसाठी प्रयत्नशील?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असताना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी त्याला विरोध केला होता. मात्र, निवडणुकीत दारुम पराभव पत्करावा लागल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी थेट कृष्णकुंज गाठायला सुरुवात केली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज राज ठाकरेंची निवासस्थानी भेट घेतली. 


लोकसभा निवडणुकीवेळी मनसेला तीन जागा सोडणार, आघाडीसोबत लोकसभा निवडणुका लढणार अशी चर्चा सुरु झाली होती. यावेळी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेली भूमिका आणि त्याचा उत्तर प्रदेश, मुंबईत होणारा परिणाम या कारणांमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी निवडणुकच लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने यावर पडदा पडला होता. मात्र, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सभा घेतल्या होत्या. या सभा 'लाव रे तो व्हिडिओ' द्वारे गाजल्याही होत्या. 


यामुळे काही महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला आघाडीसोबत घेण्याचे प्रयत्न लोकसभेला सपाटून मार खाल्ल्याने काँग्रेसकडून सुरु झाले आहेत. नुकत्याच झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत हा सूर आळवला गेला होता. तसेच काँग्रेसच्या उमेदवारांना मारक ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. याचेच एक पाऊल म्हणून आजच्या माणिकराव ठाकरे यांच्या कृष्णकुंज भेटीकडे पाहिले जात आहे. 


दरम्यान, माणिकराव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी मोदी-शहा यांना रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यामुळे मनसे आघाडीत आल्यास फायद्याचे आहे. मात्र, याचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील. मी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली, असे सांगितले आहे. या भेटीचा तपशील कळू शकलेला नसला तरीही राज यांनी आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे. 


बुधवारी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच काही दिवसांपूर्वी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीदेखिल ठाकरे यांची भेट घेतली होती. 


Web Title: Congress Manikrao Thakare meet Raj Thackeray on Krushnakunj
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.