आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:10 IST2025-06-28T18:08:49+5:302025-06-28T18:10:28+5:30
Congress Kunal Patil News: कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल, असे या नेत्यांनी म्हटले आहे.

आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
Congress Kunal Patil News:भाजपाच्या नेतृत्वाकडून किंवा नेते मंडळींकडून अनेकवेळा पक्षात प्रवेशाबाबत माझ्याशी चर्चा झालेली आहे. ही चर्चा आजची नाही. गेल्या अनेक वर्षांत अनेकदा झालेली आहे. तेव्ही मी त्यांना विनम्रपणे नकार दिला होता. त्यामुळे आज लगेचच चर्चा झाली, असे नाही. पण पुढे आता चर्चा होण्याची शक्यता आहे, असे काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.
धुळे ग्रामीणचे माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष असलेले कुणाल पाटील यांचा लवकरच भाजपा प्रवेश होणार असल्याच्या राजकीय चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कुणाल पाटील यांनी भाजपा प्रवेशबाबत आपला सस्पेन्स कायम ठेवला असून, उद्यापर्यंत मला वेळ द्यावा, असे सांगितले.
कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपा प्रवेशाबाबतचा निर्णय घेतला जाईल
अजून निर्णय झालेला नाही. परंतु, कार्यकर्ते काय विचार करत आहेत, याकडेही माझे लक्ष आहे. आमच्या पक्ष नेतृत्वाशी माझे बोलणे होईल, ते बोलणेही गरजेचे आहे. इतकी वर्ष आपण ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षातील नेत्यांशी बोलण्याचा माझा विचार आहे. परंतु, कार्यकर्त्यांची भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाचे रवींद्र चव्हाण यांच्यासोबत झालेली भेट असेल किंवा जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट असेल, ही राजकीय भेट नसून, वैयक्तिक आणि मतदारसंघातील प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी घेतलेली भेट होती. कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपा प्रवेशाबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कुणाल पाटील यांनी दिली.
दरम्यान, कुणाल पाटील हे धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत, त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तर हा काँग्रेसला मोठा धक्का ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या मेळाव्यात कार्यकर्ते पण माझ्यासोबत आहेत, कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल, असे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.