“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:05 IST2025-10-16T16:01:47+5:302025-10-16T16:05:07+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
Congress Harshwardhan Sapkal News: निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्त्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्द्याचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले होते, त्यामुळे कोणी काही तक्रार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, १३ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक होती. त्यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसचे कोणते नेते सहभागी होणार आहेत, हे स्पष्ट केले होते. त्यानुसार जेष्ठ नेते, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड सहभागी झाले होते. दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे माझी बैठक ठरलेली असल्याने मी दिल्लीला गेलो होतो. त्यामुळे काही तक्रार करण्याचा प्रश्न नाही. निवडणुकीतील घोटाळ्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुराव्यासह पर्दाफाश करत आहेत. यात महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघ व मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील घोटाळेही त्यांनी उघड केले आहेत. या घोटाळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व ठाकरे गटाला काँग्रेसने माहिती दिलेली आहे. निवडणूक आयोगाच्या भेटीत बाळासाहेब थोरात यांनी घोटाळ्याची माहिती आयोगाकडे दिली आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दिवाळीच्या शुभेच्छाही देईन
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी याआधीही संवाद झालेला आहे व यापुढेही संवाद करण्यास आनंदच होईल, त्यासंदर्भात काहीही समस्या नाही, फोन करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही देईन, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, निवडणूक आयोगाकडे गेलेले शिष्टमंडळ हे मतदार याद्यातील घोटाळे व एकूणच निवडणूक प्रक्रियेतील दोष यासंदर्भात होते, यात कोणत्या पक्षाला आघाडी वा युतीत सहभागी करून घेण्याचा मुद्दा नव्हता. मनसेकडून आघाडी विषयी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. इंडिया आघाडीत एखाद्या पक्षाचा सहभाग करायचा असेल तर त्याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.