Congress Harshwardhan Sapkal News: चंद्रपुरात उद्धवसेनेने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये उद्धवसेनेचा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व १२ नगरसेवकांनी उद्धवसेनेला मतदान केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिकेत उद्धवसेनेने जी भूमिका घेतली त्याची सल असण्याची अथवा बदला घेण्याची भूमिका व संस्कृती काँग्रेसची नाही. चंद्रपुरात उद्धवसेनेचे ८ नगरसेवक असताना त्यांनी भाजपाला मतदान केले हे राजकीय दृष्टीकोनातून चुकलेले आहे आणि त्याचे पक्ष पातळीवरून समर्थन केले जाते, काँग्रेसची लाज काढली जाते, या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे सपकाळ म्हणाले.
हे काँग्रेस पक्ष कदापी सहन करणार नाही
चंद्रपुरसंदर्भात खासदार संजय राऊत यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली होती, काँग्रेसचे नेते शिवसेना (उबाठा) शी सातत्याने संपर्कात होते असे असताना संजय राऊत व त्यांच्या पक्षातील लोकांनी जी वक्तव्ये केली ती चुकीची असून, आघाडी धर्माला शोभणारी नाहीत. वंचित बहुजन आघाडी हा काँग्रेसचा मित्र पक्ष आहे, त्यांचे २ नगरसेवकर गैरहजर राहिले, त्यांना पक्षाने बडतर्फ केले तसेच शहराध्यक्षांवरही कारवाई केली पण (शिवसेना)उबाठाने मात्र कोणतीच कारवाई केली नाही, उलट त्याचे समर्थन केले, हे काँग्रेस पक्ष कदापी सहन करणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला.
दरम्यान, परभणीत काँग्रेसचा महापौर करण्यासंदर्भात आमच्याकडे प्रस्ताव होता पण सत्तेसाठी वाट्टेल ते ही काँग्रेस पक्षाची भूमिका नाही. आम्ही सत्तेला लाथाडून आघाडी धर्म पाळला व उद्धवसेनेच्या पाठीशी उभे राहिलो. आघाडीत उद्धवसेना ही काँग्रेसची मते घेते पण काँग्रेसला मत देत नाही यावर चंद्रपूर व परभणीतील घडामोडींनी शिक्कामोर्तब केले आहे, असेही सपकाळ म्हणाले.
Web Summary : Congress supported Uddhav Sena in Parbhani mayoral election, upholding alliance dharma. Sapkal criticized Uddhav Sena's Chandrapur move, emphasizing Congress' commitment to coalition principles despite differing actions. He warned against Sena's behavior, reaffirming commitment to alliance values.
Web Summary : कांग्रेस ने परभणी महापौर चुनाव में उद्धव सेना का समर्थन किया, गठबंधन धर्म का पालन किया। सपकाल ने उद्धव सेना के चंद्रपुर कदम की आलोचना की, गठबंधन सिद्धांतों के प्रति कांग्रेस की प्रतिबद्धता पर जोर दिया। उन्होंने सेना के व्यवहार के खिलाफ चेतावनी दी, गठबंधन मूल्यों के प्रति प्रतिबद्धता की पुष्टि की।