“डुबता महाराष्ट्र बनवण्याचे पाप, महाराष्ट्राची जनता महायुतीला माफ करणार नाही”; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:07 IST2026-04-16T10:07:04+5:302026-04-16T10:07:21+5:30
Congress News: याप्रकरणी एफआयआर सार्वजनिक करण्याची गरज आहे आणि सर्व प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे

“डुबता महाराष्ट्र बनवण्याचे पाप, महाराष्ट्राची जनता महायुतीला माफ करणार नाही”; काँग्रेसची टीका
Congress News: महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातच नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचलेले आहे. राजकीय आशीर्वादामुळेच ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ बनवण्याचे पाप महायुतीने केले आहे. महाराष्ट्राच्या तरुणाईला बरबाद करणाऱ्या महायुती सरकारला जनता कदापी माफ करणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजपा महायुती सरकारवर निशाणा साधला. तुळजापूरची आई तुळजाभवानी हे आपले श्रद्धास्थान आहे, या पवित्र तिर्थक्षेत्राला मोठा अध्यात्मिक व ऐतिहासिक वारसा व परंपरा आहे परंतु याच शहराचा नगराध्यक्ष ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी असून त्याला भाजपा उमेदवारी देऊन नगराध्यक्ष बनवते, यातून काय संदेश जातो? ड्रग्जसारख्या अत्यंत गंभीर प्रकरणाला जर अशा प्रकारे राजकीय अभय मिळत असेल तर तरुण पिढीला नशेखोरीत लोटण्यास मदतच होणार आहे. वास्तविक पाहता ड्रग्ज प्रकरणात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली
मुंबईतील नेस्कोमध्ये पोलिस स्टेशनच्या समोरच ड्रग्ज व दारु पार्टी होते हे कशाचे द्योतक आहे? हे पोलीस प्रशासन, गृहमंत्री यांचे अपयश आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. ड्रग्जचा राजरोस धंदा जोरात सुरू असताना अशोक खरात, नाशिकमध्ये आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, अमरावतीमध्येही शेकडो मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. नाशिकच्या प्रकरणात जबरदस्तीने धर्मांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे. याप्रकरणी एफआयआर सार्वजनिक करण्याची गरज आहे आणि सर्व प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.