भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 09:40 IST2025-12-01T09:40:13+5:302025-12-01T09:40:59+5:30
काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारेंचा प्रवेश झाला. आगामी काळात भाजपा इनकमिंगसाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
सोलापूर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे शहरातील प्रवेश पुन्हा सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अक्कलकोट दौऱ्यावर होते. तेव्हा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसचा आणखी पदाधिकारी आणि शिंदेसेनेचा एक माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये येणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वर आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख गटाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काही प्रवेश थांबले होते. आता या प्रवेशांना पुन्हा सुरुवात झाली. शहर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांवर भाजपाने जाळे टाकले आहे. प्रभाग ६ आणि प्रभाग २३ मधील शिंदेसेनेचा एक पदाधिकारी भाजपाच्या संपर्कात आहे. तत्पूर्वी काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारेंचा प्रवेश झाला. आगामी काळात भाजपा इनकमिंगसाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.
ना त्यांनी बोलावले, ना यांनी प्रयत्न केले
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. परंतु, दोघांनाही भाजपाकडून निरोप आला नाही. विशेष म्हणजे या दोघांनीही भाजपा नेत्यांना फोन केला नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याऐवजी विविध लग्न समारंभांमध्ये सहभागी होण्यास रस दाखविल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी विमानतळावर आगमन झाले. आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी त्यांचे स्वागत केले. नगरपालिका निवडणुकीत 'साइडलाइन' असूनही दोन देशमुखांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट चर्चेचा विषय ठरली. विमानतळावर आमदार कोठे यांनी श्रीदेवी फुलारे, जॉन फुलारे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घालून दिली.
गोल्डन वुमन म्हणून परिचित
सोन्याचे भरपूर दागिने घालून पालिका सभेला येणाऱ्या श्रीदेवी फुलारे या गोल्डन वुमन म्हणूनही परिचित आहेत. प्रभागातील समस्यांवरून त्यांनी केलेली आंदोलने चर्चेत राहिली. काही वादग्रस्तही राहिली. त्यातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे वादही झाले होते. महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकीत श्रीदेवी फुलारे प्रभाग १५मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या. विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत फुलारे आणि त्यांचे पती जॉन फुलारे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. विधानसभेच्या २०२४च्या निवडणुकीत दोघेही पुन्हा काँग्रेसच्या प्रचारात दिसले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत रविवारी शासकीय विश्रामगृहात भाजपामध्ये प्रवेश केला.
काँग्रेस शहराध्यक्षांवर नेम
दरम्यान, आमदार कोठे यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रभाग १५मध्ये विशेष लक्ष घातल्याची चर्चा आहे. या प्रभागात भाजपाकडून दिलीप कोल्हे, रोडगे परिवारातील सदस्य, वैष्णवी करगुळे यांच्या नावांची चर्चा आहे. त्यात आता फुलारेंचा प्रवेश झाला. दुसरीकडे चेतन नरोटे, विनोद भोसले यांच्या माध्यमातून नवी सामाजिक समीकरणे घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.