ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:09 IST2025-05-21T18:08:48+5:302025-05-21T18:09:53+5:30

Operation Sindoor, Congress vs BJP: युद्धविरामाच्या मुद्द्यावरून भाजपा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

Congratulations to Indian army for 'Operation Sindoor' but what about ceasefire donald trump connections said Congress Harshwardhan Sapkal | ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस

ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस

Operation Sindoor, Congress vs BJP: काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा बळी गेला. प्रत्युत्तरात भारताने 'ऑपरेशन सिंदूर' केले आणि पाकिस्तान, PoK मधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यात सुमारे १०० दहशतवादी ठार झाल्याने खवळलेल्या पाकिस्तानने त्यानंतर भारतावर हवाईहल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकचे सर्व हल्ले अयशस्वी ठरले. भारताने पाकिस्तानवर हल्ले करून धडा शिकवावा असे सर्वांनाच वाटत होते. पण दोन्ही देशांनी हानी टाळण्याच्या उद्देशाने युद्धविरामाचा पर्याय स्वीकारला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धविरामाची घोषणा केली. याच मुद्द्यावर काँग्रेस मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सैन्यदलाचे अभिनंदन केलेच पाहिजे पण काही प्रश्नांची उत्तरे सरकार का देत नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

युद्धविराम जाहीर करणारे डोनाल्ड ट्रम्प कोण?

"देशाची एकता व अखंडता कायम राहावी यासाठी इंदिरा गांधी व राजीव गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन करत आहेत. पण अचानक युद्धविराम जाहीर करणारे डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही?" असा सवाल सपकाळ यांनी केला.

...तर सरकार जबाबदार असेल!

"आज एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू आहेत. देशाच्या सीमेवर जवानांनी आपल्या शौर्याची पराकाष्ठा करत पाकिस्तानला धडा शिकवला याबदद्ल सर्वांना अभिमान आहे पण इकडे राज्यातील शेतकरी मात्र संकटात आहे, सरकारचे त्याकडे लक्ष नाही, कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अपमान करत असतात. काँग्रेसच्या आजच्या ट्रॅक्टर रॅलीने आंधळ्या, बहिऱ्या सरकारचे डोळे उघडतील अशी आशा आहे. पण सरकारने बळीराजाला मदत केली नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही आणि शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही तर हा लढा आणखी तीव्र करू आणि त्यानंतर जो परिणाम होईल त्याला सरकार जबाबदार असेल," असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.

राज्यभर काँग्रेसची 'तिरंगा यात्रा'

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राज्यभर सर्व जिल्हा व तालुक्यात 'तिरंगा यात्रा' काढून 'ऑपरेशन सिंदूर'मधील वीरांना अभिवादन करण्यात आले. 'जरा याद करो कुर्बानी' या प्रेरणादायी संकल्पनेतून ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Congratulations to Indian army for 'Operation Sindoor' but what about ceasefire donald trump connections said Congress Harshwardhan Sapkal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.