आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:21 IST2025-07-03T18:18:55+5:302025-07-03T18:21:18+5:30

Sangli Lady Doctor death, Neelam Gorhe: डॉक्टर महिलेचा मृतदेह तिच्याच कारमध्ये सापडला, हात-गळ्याच्या नसांवर कापल्याच्या जखमा

conduct thorough investigation of sangli female doctor death weather it is suicide or murder Neelam Gorhe orders | आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

Sangli Lady Doctor death, Neelam Gorhe: सांगलीच्या इस्लामपूरजवळील विठ्ठलवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे डॉक्टर शुभांगी वानखडे (वय ४४, रा. मुंबई) यांच्या आत्महत्येप्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे प्रकरणाची तातडीने व सखोल चौकशी व्हावी, असे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. डॉ. शुभांगी वानखडे यांचा मृतदेह २ जुलै २०२५ रोजी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्याच कारमध्ये संशयास्पदरित्या सापडला. त्यांच्या हातावर आणि गळ्यावर नसा कापल्याच्या गंभीर जखमा आढळल्या. ही आत्महत्या आहे की यामागे अन्य कोणती पार्श्वभूमी आहे, हे शोधणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी मत मांडले.

उपसभापती गोऱ्हे यांनी मागणी केली की, या प्रकरणाचा तपास भारतीय न्याय संहितेच्या व अन्य अनुषंगिक तरतुदी अंतर्गत तातडीने सुरू करण्यात यावा. याशिवाय, आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा धमकी देणे यासारखे कोणतेही संकेत मिळाल्यास त्यांचाही तपास करण्यात यावा. डॉ. शुभांगी वानखडे यांच्या मोबाईल फोन, पत्रव्यवहार, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स, ई-मेल्स आणि सोशल मीडियावरील संवाद यांची सखोल तपासणी करून मृत्यूमागील खऱ्या कारणांचा शोध घेण्यात यावा. त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात मानसिक, आर्थिक किंवा सामाजिक दडपण होते का, हेही तपासण्यात यावे.

डॉ. गोऱ्हे यांनी मृत्यूपूर्वी कोणी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा थेट किंवा अप्रत्यक्ष दबाव टाकला होता का, याची शहानिशा करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणात कोणतेही साक्षीदार असतील, तर त्यांना साक्षीदार संरक्षण कायदा २०१८ अंतर्गत संरक्षण द्यावे, असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष, पारदर्शक आणि जलदगतीने व्हावी, अशी ठाम भूमिका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडली आहे. ही घटना केवळ एका महिला डॉक्टरच्या आत्महत्त्येपुरती मर्यादित न राहता, समाजात अशा दुर्दैवी घटनांना आळा बसण्यासाठी संबंधित यंत्रणांनी गंभीरतेने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

Web Title: conduct thorough investigation of sangli female doctor death weather it is suicide or murder Neelam Gorhe orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.