complaint against new flag of mns by sambhaji brigade | मनसेचा नवा झेंडा वादात ; संभाजी ब्रिगेडचा पाेलिसांकडे तक्रार अर्ज
मनसेचा नवा झेंडा वादात ; संभाजी ब्रिगेडचा पाेलिसांकडे तक्रार अर्ज

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिले महाअधिवेशन आज मुंबईतील गाेरेगाव भागात पार पडत आहे. राज्यातून हजाराे मनसैनिक या अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. हा झेंडा संपूर्ण भगवा असून त्याच्या मध्यभागी शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या नव्या झेंड्यामुळे आता वाद निर्माण हाेण्याची शक्यता आहे. या झेंड्याला विविध शिवप्रेमी संघटनांनी विराेध दर्शवला आहे. 

या झेंड्याच्या विराेधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून मनसे पक्ष आणि राज ठाकरेंच्या विराेधात गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज पुण्याच्या सहाय्यक पाेलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांना देण्यात आला आहे. राजमुद्रेचा वापर काेणत्याही राजकीय पक्षाने करणे चुकीचा असून राजमुद्रेचा झेंड्यात वापर करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राज ठाकरे यांना नाही असे या तक्रार अर्जात म्हंटले आहे. तसेच राजमुद्रेच्या वापरामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून मनसेच्या विराेधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. 

मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या नव्या ध्वजाचं अनावरण 

'छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही शिवरायांची प्रशासकीय मुद्रा असून, राजमुद्रेचा वापर करुन शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले. शिवरायांच्या लाेककल्याणकारी प्रशासनाचे प्रतिनिधित्व करणारी राजमुद्रा ही रयचेच्या राज्याचे सार्वभाैमत्व सिद्ध करणारी आहे. तीचा वापर काेणत्याही राजकीय पक्षाने करणे हे चुकीचे असून प्रांत, भाषा, जात - धर्म यावर आधारित राजकारण करणाऱ्या मनसे राज ठाकरे यांना राजमुद्रेचा वापर करण्याचा काेणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे मनसे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करत आहाेत. तसेच राज ठाकरे ( संस्थापक) मनसे यांनी राजमुद्रेचा गैरवापर केले प्रकरणी त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईल आंदाेलन करण्यात येईल' असे तक्रार अर्जात म्हंटले आहे. 

Web Title: complaint against new flag of mns by sambhaji brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.