मुंबई - अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकत्र येण्याचे ठरवले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याचं ठरले होते. १२ फेब्रुवारीला ही घोषणा होणार होती असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. मात्र यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटाला फटकारले आहे. अजित पवार जर अशी चर्चा करत होते तर ती चर्चा ते एनडीएतून बाहेर पडण्यासाठी करत होते का? ते सरकारमधून बाहेर पडणार होते का? ते स्पष्टपणे सरकारमध्ये स्थिर होते. त्यामुळे रोज काहीतरी गोंधळ निर्माण करायचा आणि आपली इकोसिस्टम वापरून त्याला बळ द्यायचे हे अयोग्य आहे. मृत्यूच्या आदल्यादिवशी आम्ही १ तास गप्पा मारत होतो असं सांगत फडणवीसांनी मोठा खुलासा केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आताच्या परिस्थितीत आम्हाला राजकारण करायचे नाही नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलं, काय घडतंय..मी अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. माझे आणि अजितदादांचे संबंध चांगले होते. त्यात ते जवळजवळ सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी आम्ही १ तास गप्पा मारत बसलो होतो. त्यामुळे याबाबतीत खालच्या स्तराचे राजकारण करणे योग्य नाही. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतलाआहे. आज २ वेगवेगळे पक्ष झालेत. शरद पवारांचा पक्ष, अजित पवारांचा पक्ष आहे. आता अजित पवारांच्या पक्षाने निर्णय घेतला की सुनेत्रा पवारांनी नेतृत्व करावे. सुनेत्रा पवारांशी चर्चा करून शपथविधी झाला. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे असं त्यांनी स्पष्ट केले.
त्याशिवाय अजित पवार हे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा करत होते तर ते कुठलीही चर्चा भाजपाशी चर्चा केल्याशिवाय करतील का? जर ते चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपाशी चर्चा केली असती, जर ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. पहिल्यांदा हे लक्षात घेतले पाहिजे. चर्चा करायची, चर्चा नाही करायची, विलीनीकरण करायचे हे सर्वस्वी १०० टक्के निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. परंतु कुठलाही निर्णय घेण्याआधी त्यांनी आमच्याशी एकदा चर्चा करावी ही अपेक्षा आहे. ते चर्चा करतात आणि पुढेही करतील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
दरम्यान, आमची पहिल्यापासून भूमिका आहे आमचे साथीदार अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्याच्या पाठीशी राहणे ही आमची जबाबदारी आहे. ती आम्ही कालही केली आणि आजही करू. शपथविधी कधी करायचा, काय करावे हा निर्णय पक्ष घेत असतो. इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यानंतर अंत्यसंस्काराच्या दिवशीच काँग्रेसने राजीव गांधींना पंतप्रधान केले पाहिजे असा निर्णय घेतला. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय पक्ष घेत असतात. तसा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. त्यावर इतकी टीका केली जातेय. टीका करणारे हँडलर्स पाहिले तर टीका कुठल्या मानसिकतेतून केली जाते हे पाहा. मला राजकारण करायचे नाही नाहीतर मी हे सविस्तरपणे सांगू शकलो असतो असा इशाराही फडणवीसांनी टीकाकारांना दिला.
...म्हणून अर्थ खाते माझ्याकडे ठेवले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा केली. कारण अर्थसंकल्प मांडायचा आहे. अर्थसंकल्प हे नुसते एक भाषण वाचायचे नसते तर यासाठी विविध बैठका घ्याव्या लागतात. वेगवेगळ्या विभागांची बैठक घ्यावी लागते. त्यांचा आढावा घेऊन सर्व योजना त्यांच्या अर्जात आणल्यात की नाही, ज्या कायमस्वरुपी योजना आहेत त्याच्या पुरवणी मागण्या मागणार नाहीत, त्यादृष्टीने बजेट कमी अधिक करावे लागते. या सर्व गोष्टी असल्याने सुनेत्रा पवार आत्ताच उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे इतका मोठा भार त्यांच्यावर सध्या सोपवणे तशी परिस्थिती नाही. त्या दुखातून पूर्णपणे बाहेर आल्या नाहीत त्यामुळे पूर्ण क्षमतेने त्या काम करायला लागतील अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. त्यामुळे आम्ही एकत्रित चर्चा करून अर्थ खाते माझ्याकडे ठेवून मी बजेटची कामे पूर्ण करावीत असं ठरले. अधिवेशनानंतर पुढे काय करायचे हे चर्चा करून ठरवू असं स्पष्टीकरण फडणवीसांनी अर्थ खात्याबाबत दिले.
पार्थ पवारांना विरोध?
भाजपाने कुणाला विरोध केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्यात कुणाला पद द्यायचे, तिकीट द्यायचे, कुणाला संधी द्यायची याचे निर्णय ते घेतात. ते आम्ही घेत नाही. जेव्हा ते आमच्यासोबत आले तेव्हाही तुम्ही पाहिले असेल. कुणाला आमदार करायचे, कुणाला खासदार करायचे, कुणाला अध्यक्ष करायचे, कुणाला मंत्री करायचे हे सगळे निर्णय राष्ट्रवादीने घेतले आहेत. त्या निर्णयात आमचे काही म्हणणे नाही. आमची काही भूमिका नाही असं सांगत पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्याला भाजपाचा विरोध असल्याच्या बातम्यांचे फडणवीसांनी खंडन केले आहे.
Web Summary : Fadnavis refuted NCP merger claims, revealing an hour-long conversation with Ajit Pawar the day before his death. He emphasized that NCP decisions regarding leadership, like Sunetra Pawar's appointment, are internal matters. He also clarified his retention of the finance portfolio due to Sunetra Pawar's recent appointment.
Web Summary : फडणवीस ने राष्ट्रवादी कांग्रेस के विलय के दावों का खंडन किया और अजित पवार के निधन से एक दिन पहले उनसे हुई एक घंटे की बातचीत का खुलासा किया। उन्होंने जोर देकर कहा कि नेतृत्व के संबंध में राष्ट्रवादी कांग्रेस के फैसले, जैसे कि सुनेत्रा पवार की नियुक्ति, आंतरिक मामले हैं। उन्होंने सुनेत्रा पवार की नियुक्ति के कारण वित्त मंत्रालय अपने पास रखने की बात भी स्पष्ट की।