वाल्मीक कराडवरील दोन कलमे CIDने वगळली; सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 20:21 IST2025-03-03T20:19:49+5:302025-03-03T20:21:13+5:30

वाल्मीक कराडला वाचवण्याचा हा प्लॅन आहे का, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.

CID dropped two articles on Valmik Karad alligations of ncp mp Supriya Sule | वाल्मीक कराडवरील दोन कलमे CIDने वगळली; सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या...

वाल्मीक कराडवरील दोन कलमे CIDने वगळली; सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या...

NCP Supriya Sule: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने नुकतेच न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. मात्र या आरोपपत्राबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. सीआयडीने टोळीचा म्होरक्या म्हणून सुदर्शन घुले याचा उल्लेख केल्याने वाल्मीक कराडला वाचवण्याचा हा प्लॅन आहे का, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. अशातच आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मीक कराडवरील खंडणीच्या गुन्ह्यातील दोन कलमे वगळण्याची मेहरबानी सीआयडीने का दाखवली आहे, असा प्रश्न उपस्थित करत आपला संताप व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "स्व. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शासनाकडे न्याय मागणाऱ्या देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंची दखल शासन घेत नाही, असे दिसत आहे. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या हत्याकांडातील आरोपी वाल्मीक कराड याच्यावरील खंडणीच्या गुन्ह्याबाबतची दोन कलमे सीआयडीने वगळली. ही अतिशय संतापजनक बाब आहे. या संपूर्ण घटनाक्रमातील खंडणी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. याबाबतचा गुन्हा वगळण्याची मेहेरबानी सीआयडीने का केली याचे उत्तर शासनाने देशमुख कुटुंबियांना देणे गरजेचे आहे," अशी भूमिका खासदार सुळे यांनी मांडली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर तपास यंत्रणांकडून काय खुलासा केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाल्मीक कराड आणि टोळीची क्रूरता उघड

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. वाल्मीक कराड म्होरक्या असलेल्या या टोळीने पाइपला करदोड्याने मूठ तयार करून मारहाण केली. तसेच, एका लोखंडी पाइपमध्ये क्लच वायर टाकून त्यानेही बेदम मारहाण केली. हे पुराव्यांसह सीआयडीने कराड आणि त्याच्या टोळीविरोधात तब्बल ६६ भक्कम पुरावे जप्त केले आहेत. तसेच, १८४ साक्षीदारांचे जबाब घेतले असून, त्यात पाच गोपनीय साक्षीदारांचाही समावेश आहे. सरपंच देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी अपहरण करून हत्या झाली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. आता मारहाण, खंडणी आणि हत्या या तिन्ही प्रकरणांचे एक हजार पानांचे दोषारोपपत्र सीआयडीने न्यायालयात दाखल केले. याचे अवलोकन केल्यानंतर अंगावर शहारे आणणारे कृत्य या टोळीने केल्याचे दिसते.  

मारहाण करताना ‘एन्जॉय’ केला खून

देशमुख यांचे कपडे काढून मारहाण केली. हे करताना आरोपी मोठमोठ्याने हसत सदर घटनेचा आनंद  साजरा करीत असल्याचा दावा सीआयडीने आरोपपत्रात केला. आरोपींनी याचा शेअर केलेला व्हिडीओदेखील सीआयडीच्या हाती लागला आहे. 

Web Title: CID dropped two articles on Valmik Karad alligations of ncp mp Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.