मुख्यमंत्रीपदास सुशीलकुमार शिंदेंचा नकार ?

By Admin | Updated: June 20, 2014 12:48 IST2014-06-20T12:48:10+5:302014-06-20T12:48:10+5:30

सुशीलकुमार शिंदे यांनाही आता सक्रीय राजकारणात राहायची इच्छा नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यास इच्छूक नाहीत अशी चर्चा आहे.

Chief Minister Sushilkumar Shinde's denial? | मुख्यमंत्रीपदास सुशीलकुमार शिंदेंचा नकार ?

मुख्यमंत्रीपदास सुशीलकुमार शिंदेंचा नकार ?

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २०-  राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होण्याची शक्यता असून मुख्यमंत्रीपदावर पृथ्वीराज चव्हाण यांच्याऐवजी माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची वर्णी लागेल अशी चर्चा रंगली आहे. मात्र खुद्द सुशीलकुमार शिंदे यांनाही आता सक्रीय राजकारणात राहायची इच्छा नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यास इच्छूक नाहीत अशी चर्चा आहे. तर पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात नेतृत्व बदल करावे यासाठी काँग्रेसवर राष्ट्रवादी काँग्रेसने दबाव वाढवला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याऐवजी सुशीलकुमार शिंदेना मुख्यमंत्री केले जाईल अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात रंगली आहे.  मात्र लोकसभा निवडणुकीत सोलापूरमधून पराभूत झाल्यावर सुशीलकुमार शिंदेंना आता सक्रीय राजकारणातून बाहेर पडायचे असे सूत्रांनी सांगितले. २००४ मध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखाली आघाडीला विजय मिळाला होता. मात्र त्यानंतर शिंदेंऐवजी विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली होती. तेव्हापासून शिंदेंनी पुन्हा राज्यात न परतण्याचा निर्णय घेतला होता असे शिंदेंच्या निकटवर्तींयांचे म्हणणे आहे. शिंदेंनीही पुन्हा मुख्यमंत्रीपदावर परतणार का याप्रश्नावर मौन बाळगणेच पसंत केले आहे. मला याविषयी काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे.मात्र सोनिया गांधींनी आदेश दिल्यास सुशीलकुमार शिंदे पक्षहितासाठी मुख्यमंत्रीपदावर बसतील असेही काही जणांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्रीपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव शरद पवारांनीच सुचवल्याचे वृत्त आहे. 
पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारणार 
नेतृत्व बदलाच्या चर्चेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अद्याप पक्षाकडून नेतृत्वबदलाविषयी कोणताही आदेश आलेला नाही. या फक्त चर्चाच आहे. पण पक्षाने आदेश दिल्यास कोणतीही भूमिका स्वीकारायला तयार आहोत. 

Web Title: Chief Minister Sushilkumar Shinde's denial?