मुख्यमंत्र्यांकडून होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा; राज्यातील जनतेला काय आवाहन केलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:33 IST2025-03-13T18:32:56+5:302025-03-13T18:33:23+5:30
उत्सव साजरा करताना, पर्यावरणाचा आदर करण्याचा वसा आपल्या संस्कृतीने दिला आहे. हा वसा आपण निर्धाराने पुढे नेऊया, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा; राज्यातील जनतेला काय आवाहन केलं?
CM Devendra Fadnavis: "भारतीय संस्कृतीत सण, उत्सवातून निसर्ग रक्षणाचा मंत्र जपला जातो. हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूरकरित्या सण साजरा करूया. विकसित भारतातील, विकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईल, अशी प्रतिज्ञा घेऊया," असं आवाहन करत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सणानिमित्त शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्र विकासाच्या पथावर अग्रेसर आहे. या सकारात्मक वाटचालीत येणाऱ्या आव्हानांवर मात करण्याची प्रेरणा या सणांकडून घेऊया. उत्सव साजरा करताना, पर्यावरणाचा आदर करण्याचा वसा आपल्या संस्कृतीने दिला आहे. हा वसा आपण निर्धाराने पुढे नेऊया. या उत्सवांच्या काळात वृक्ष जतन, जलसुरक्षा- जलसंवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे रक्षण आणि पर्यावरणपूरक घटकांचा वापर करूया. यातून जल- वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळूया."
दरम्यान, "सण-उत्सवांच्या निमित्ताने परस्पर आदर, स्नेह-भाव वृद्धिंगत व्हावा, यासाठी प्रयत्न करूया. सामाजिक-सलोखा आणि शांती-सौहार्द कायम राखण्याची आपली परंपरा आहे. ही आणखी दृढ व्हावी, यासाठी एकजूटीने आणि निर्धारपूर्वक प्रयत्न करूया. या सगळ्यातून आपला विकसित महाराष्ट्र पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध होईल, यासाठी कटिबद्ध राहूया," अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.