“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 19:16 IST2025-09-24T19:16:17+5:302025-09-24T19:16:17+5:30
Chhagan Bhujbal News: असा पाऊस यापूर्वी आम्ही बघितला नाही, असे अनेक लोक म्हणत आहेत. पहिल्या टप्प्यात मदत केली आहे, असे छगन भुजबळांनी सांगितले.

“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
Chhagan Bhujbal News: अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. राज्य सरकारने आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. यापैकी १ हजार ८२९ कोटी रुपये जिल्हास्तरावर वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री पूरग्रस्त भागाला भेटी देण्याबाबत बैठकीत ठरवण्यात आले. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पूरग्रस्त ठिकाणी जाऊन पाहणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्राची मदत १०० टक्के येईल, संकट एवढे मोठे आहे की, मदतीची वाट न बघता बाधित लोकांना मदत करायला सरकार पुढे येईल. पंचनामा झाल्यानंतर किती मदत द्यावी हे स्पष्ट होईल. पहिल्या टप्प्यात मदत केली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. असा पाऊस यापूर्वी आम्ही बघितला नाही, असे अनेक लोक म्हणत आहेत. ढगफुटी अनेक ठिकाणी होत आहे, ग्लोबल वॅार्मिंगचे परिणाम दिसून येत आहेत. पाऊस पडत नाही तर कोसळत आहे. त्यामुळे, टाऊन प्लॅनिंग करताना विचार व्हायला हवा, असेही भुजबळ म्हणाले.
पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ मोफत
राज्यातील पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ वितरण करण्यास सुरुवात झाली असून, आत्तापर्यंत २ हजार ६५४ कुटुंबाना मदत केली आहे. साडेसव्वीस मेट्रिक टन गहू तांदूळ दिला आहे, आमच्या विभागाकडून अन्नधान्य पुरवठा केला जातो आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. दुसरीकडे, महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये मदतकार्य तातडीने व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी एका महिन्याच्या पगाराचा पूर्ण मोबदला जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सहकारी मंत्र्यांसह पूरग्रस्त जिल्हयांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत, शिवाय नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत असेही सुनील तटकरे म्हणाले. शेतकरी, कामगार आणि सर्व सामान्य जनतेच्या दु:खाच्या कठीण काळात राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगतानाच आगामी काळात आणखीही मदत व दिलासा देणार्या उपाययोजना जाहीर करण्यात येतील, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.