समर्थकांची आज चर्चा, छगन भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत?; अजितदादांची चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 09:22 IST2024-12-17T09:21:03+5:302024-12-17T09:22:18+5:30
छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे भुजबळ नाराज झाले आहेत.

समर्थकांची आज चर्चा, छगन भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत?; अजितदादांची चिंता वाढली
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलल्याने समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. मी सामान्य कार्यकर्ता कुणी फेकलं, डावललं तरी काय फरक पडतो असं सांगून भुजबळांनी उघड नाराजी व्यक्त केली. नागपूर अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भुजबळांनी त्यांची नाराजी व्यक्त करून अधिवेशनातून काढता पाय घेत नाशिकला रवाना झाले. आज ते समता परिषदेच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघातील लोकांशी चर्चा करणार आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी दूर होणार की ते पक्ष सोडणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे राज्यसभेची ऑफर नाकारल्याचं सांगितले. भुजबळ म्हणाले की, मला ८ दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते, परंतु मी माझ्या विधानसभा सदस्याचा राजीनामा देऊ शकत नाही. ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल. मी जाणार नाही असं सांगितले. त्यानंतर माझी अजितदादांशी कुठलीही चर्चा नाही. नाशिकला लोकांना भेटणार आहे असं त्यांनी म्हटलं. त्यावर पत्रकारांनी तुमची पुढची भूमिका काय असा सवाल केला. तेव्हा जहां नहीं चैना, वहां नहीं... असं सूचक विधान केले आहे.
छगन भुजबळांना वगळण्यावरून राष्ट्रवादीत मतभेद असल्याचं पुढे आले आहे. भुजबळ मंत्रिमंडळात हवेत असं बहुतांश आमदारांचे म्हणणे होते. ओबीसी समाजाची बाजू भुजबळांनी ठामपणे मांडल्यामुळे निवडणुकीत मदत झाली असं आमदारांनी मत मांडले. त्याशिवाय आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फटका बसू नये या पार्श्वभूमीवर भुजबळांना वगळण्यात येऊ नये असं काहींचे मत होते. तरीही छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे भुजबळ नाराज झाले आहेत.
दरम्यान, मंत्र्यांना डच्चू देण्याचा प्रश्न येत नाही. नवीन सरकार स्थापन झालं आहे. भरघोस आमदार महायुतीकडे आहेत. प्रत्येक पक्षाला ठरलेल्या मंत्रिमंडळाच्या संख्येपैकी काही लोकांना संधी देणे गरजेचे होते. म्हणून जुने अनुभवी लोकही त्यात आहेत. नव्या लोकांना अनुभव देण्याच काम सरकारने केले आहे. १९८५ पासून भुजबळ साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे. राज्याचे विविध विभागाचे मंत्रिपदही त्यांनी सांभाळले आहे. आज अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच त्यामध्ये त्यांचा मोठा काही निर्णय होणार असेल. मोठा निर्णय म्हणजे देशाच्या कोणत्या ना कोणत्या राज्याचे भुजबळ राज्यपाल होऊ शकतात. त्यांच्या पक्षाने तशी योजना बनवली असेल असा दावा भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी केला आहे.