"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:28 IST2025-09-03T13:27:46+5:302025-09-03T13:28:35+5:30
भुजबळ म्हणाले, "यासंदर्भात आम्हा ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या मानात मोठ्या शंका आहेत. आम्ही विचार करत आहोत, कोण हरल? कोण जिंकलं? यासंदर्भात आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत.

"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे यांच्या मागण्या मंगळवारी मान्य केल्या. त्या मागण्यांसंदर्भात जीआरही काढला. यानंतर, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण सोडले. यावर आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "हा निर्णय कुणालाही अपेक्षित नव्हता. कुठल्याही जातीला उचलून, दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही. जात बदलता येत नाही. आम्ही न्यायालयात जाणार," असे भुजबळ यांनी म्हटले आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.
भुजबळ म्हणाले, "यासंदर्भात आम्हा ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या मानात मोठ्या शंका आहेत. आम्ही विचार करत आहोत, कोण हरल? कोण जिंकलं? यासंदर्भात आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत. याचा काय अर्थ आहे. कारण, कुठल्याही जातीला उचलून, दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही. जात बदलता येत नाही ना. यावर, आपण या संदर्भात न्यायालयात जाणार आहात का? असा प्रश्न केला असता, भूजबळ यांनी 'होय', असे उत्तर दिले."
दरम्यान, या सर्व मागण्या उपसमितीने मान्य केल्या आहेत, जे की आयोगाच्या माध्यमातून होणे आवश्यक होते, असे एका पत्रकाराने विचारले असता, भुजबळ म्हणाले, "मला असे वाटतं. काही लोक म्हणतात, हरकती मागवायला हव्या होत्या. काही लोक म्हणतात की, यांना अधिकार आहे का? आता बघू ते सर्व. आम्ही विचार करतो." एवढेच नाही तर, असा काही निर्णय होईल, अशी अपेक्षा कुणालाच नव्हती, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.