छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:57 IST2025-09-03T14:48:56+5:302025-09-03T14:57:59+5:30
सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ अशी उघड भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे.

छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
मुंबई - ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. भुजबळांच्या नाराजीनाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची तातडीची बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी ही बैठक होत असून यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल उपस्थित असतील. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणास बसले होते. त्यावेळी हैदराबाद गॅझेटबाबत जीआर काढून राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर ओबीसी समाजात नाराजीची लाट पसरली आहे.
आज मंत्रिमंडळाच्या आधी झालेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी उघडपणे भूमिका घेत ओबीसींवर अन्याय होत असल्याचे म्हटलं. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीवर भुजबळांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे ओबीसी संघटनांमध्ये असंतोष आहे. या प्रकरणात वकिलांचा सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. सरकारच्या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ अशी उघड भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे.
तर भुजबळांचा गैरसमज झाला आहे. काही विशिष्ट समाजाला डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर सरकारने एक धाडसी निर्णय केला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही यामुळे धक्का लागणार नाही. त्यामुळे विनाकारण गैरसमज करून घेऊन नये. आम्ही कुणाचे आरक्षण काढून घेत नाही. जे वास्तव आहे ते स्वीकारले पाहिजे. वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे असं मराठा आरक्षणाबाबत नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, छगन भुजबळांसारखा अभ्यासू नेता नाराज होऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडला, त्याचा अर्थ हा जीआर पक्का आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. छगन भुजबळ हे ओबीसींच्या बाजूने कायम भूमिका घेत आहेत. त्या भूमिकांमुळे भुजबळांना मोठी किंमतही मोजावी लागली आहे. ओबीसींचा लढा सुरू राहील. भुजबळांच्या लढाऊ वृत्तीला मी दाद देतो असं सांगत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांचे कौतुक केले आहे.