आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 00:06 IST2025-09-19T00:03:07+5:302025-09-19T00:06:38+5:30
Chhagan Bhujbal News: मनोज जरांगेंनी २५ वेळा उपोषण केले आणि सोडले. कुणी विचारत नव्हते. निवडणुकीत धडा शिकवणार, असा निर्धार करत, तेव्हाची वस्तुस्थिती माहिती असतानाही, पवार तिथे गेले, असा खळबळजनक आरोप छगन भुजबळ यांनी केला.

आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
Chhagan Bhujbal News: त्याच्यामध्ये काही आमदार होते. होय, पवार साहेबांचे आमदार होते. मी नावेही घेऊ शकतो. अनेक गोष्टी नंतर बाहेर पडल्या. यांनी सांगितले त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड ठेवले. सकाळी पोलीस आले, तेव्हा तुफान दगडांचा मारा सुरू झाला. पोलीस पळत होते. घरामध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करत होते. घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले. परत बाहेर चोपायचे. महिला पोलीसही त्यात होत्या, त्यांना त्रास झाला. महिला पोलिसांसह ८४ पोलीस रुग्णालयात दाखल झाले. आजही याचा रेकॉर्ड त्या रुग्णालयात आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते समता परिषदेच्या मेळाव्यात बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू होते, या आंदोलनादरम्यान मोठा राडा झाला होता. यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर बोलताना छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला आहे. त्यांचा प्लान आदल्या रात्रीच ठरला होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहिती असतानाही, शरद पवार त्या ठिकाणी गेले, असेही भुजबळ यांनी सांगितले. छगन भुजबळ यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना सुरुवात झाली असून, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनोज जरांगेंनी २५ वेळा उपोषण केले, सोडले, त्यांना कुणी विचारत नव्हते
पवार साहेब, दोन वर्षांपासून मनोज जरांगे उपोषण करत होते. २५ वेळा उपोषण केले, कुणी त्यांना विचारले नाही. ते उपोषण करायचे आणि सोडायचे. मग रात्रीतून बैठका झाल्या. त्यात काही आमदार होते. निवडणूक आली की, जरांगे उभा राहतो. जरांगे उभा राहिला की, काही लोक पाया पडायला जातात. मग पैसे घ्या, अमूक घ्या, तमूक घ्या, सुरू होते. हे काय चालले आहे. तुम्ही एकत्र झालात आणि ठरवले की, जे जरांगेच्या पायाशी जातील, त्यांना आपल्या विरोधात सपोर्ट करतील, त्यांना निवडणुकीत धडा शिकवणार, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.
दरम्यान, आपली मागणी आहे की, ते ६ जीआर मागे घ्या किंवा त्यात आवश्यक सुधारणा करा. त्यात निश्चितच आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सांगितले होते की, जनहित याचिका नको, रिट याचिका करा, आतापर्यंत आम्ही ४-५ रीट याचिका केल्या आहेत. आरक्षणाचा पाया आर्थिक विषयावर नाही, सामाजिक मागासलेपणावर आहे. आमचीही लेकरेबाळेच आहेत. ओबीसी जात नाही, अनेक जातींचा समूह आहे, छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.