जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:26 IST2025-07-01T13:26:07+5:302025-07-01T13:26:58+5:30
Raj Thackeray - Uddhav Thackeray, Vidhan Sabha Adhiveshan: हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यावरून दोन्ही ठाकरे बंधू याला मराठीचा, आपला विजय मानत आहेत. तर भाजपा उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना त्रिभाषा आयोगाचा अहवाल स्वीकारला होता, तो आपण रद्द केल्याचे सांगत आहे.

जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे कामकाज सुरु झाल्याझाल्याच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. यामुळे विधानसभेत मोठा गोंधळ उडाला असून पटोले यांना निलंबित करण्यात आले आहे. अशातच विधानसभेबाहेर आणखी एक मुद्दा तापविला जात आहे, तो म्हणजे हिंदी भाषा सक्ती आणि राज-उद्धव ठाकरे एकत्र येणे. यावर राज ठाकरे यांचे एकेकाळचे आमदार राम कदम यांनी ठाकरेबंधुंच्या एकत्र येण्यावर भविष्यवाणी केली आहे.
हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यावरून दोन्ही ठाकरे बंधू याला मराठीचा, आपला विजय मानत आहेत. तर भाजपा उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना त्रिभाषा आयोगाचा अहवाल स्वीकारला होता, तो आपण रद्द केल्याचे सांगत आहे. येत्या सहा तारखेला हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे एकत्र येऊन मोर्चा काढणार होते. परंतू, प्रकरण तापण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जीआर रदद् केला आहे. यावरून राम कदम यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या जुलमी निर्णयाला केराची टोपली दाखवली याचा गोष्टीचा जल्लोष करावा असा टोला कदम यांनी लगावला आहे. तसेच हिंदी सक्ती करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय होता. फडणवीस यांनी तो निर्णय रद्द केला, म्हणजे फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला आहे, असा युक्तीवाद कदम यांनी केला आहे.
उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरही राम कदम यांनी भविष्यवाणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्या विजय मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसले तर ते राज ठाकरेंना आवडणार आहे का असा सवाल राम कदम यांनी केला आहे. झेंडे पाकिस्तानचे, भाषा काँग्रेसची अशी टीका करतानाच सावरकरांवर राहुल गांधी काही बोलले तर ते गप्प राहतात. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना सोडलेली ही उबाठा आहे. अशी ही उबाठा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोबत घेऊन जाणारी मनसे ही दोन्ही समीकरण राजकारणासाठी कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, असे राम कदम म्हणाले आहेत.