चांद्रयान ३ माेहिमेत महाराष्ट्र; सोलापूर,सांगलीसह खान्देशपुत्रांचं लय भारी काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 07:17 AM2023-07-16T07:17:26+5:302023-07-16T07:19:52+5:30

खान्देशच्या सुपुत्राची महत्त्वपूर्ण भूमिका

Chandrayaan 3 in Maharashtra; Solapur, Sangli and Khandeshputra rhythm heavy work | चांद्रयान ३ माेहिमेत महाराष्ट्र; सोलापूर,सांगलीसह खान्देशपुत्रांचं लय भारी काम

चांद्रयान ३ माेहिमेत महाराष्ट्र; सोलापूर,सांगलीसह खान्देशपुत्रांचं लय भारी काम

googlenewsNext

संजय देसर्डा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव / चोपडा  :  भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चंद्रयान-३ चे शुक्रवारी यशस्वी प्रक्षेपण केले. या मोहिमेमध्ये हातेड (ता. चोपडा जि. जळगाव) या छोट्याशा गावातून इस्रोपर्यंत पोहचणारे संजय गुलाब देसर्डा यांची महत्त्वाची भूमिका ठरली आहे. 

चोपडा येथील वर्धमान जैन श्री संघाचे संघपती गुलाबचंद इंदरचंद देसर्डा यांचे सुपुत्र असलेले संजय हे गेल्या २० वर्षांपासून इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चंद्रयान-३ साठी त्यांनी द्रवरूप इंधनावर काम केले. यानाचे पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि काल प्रक्षेपित झालेल्या यानात एलव्हीएम ३ मध्ये द्रव (लिक्विड) इंधन लागत असते. यात इस्त्रोकडून वरिष्ठ शास्त्र म्हणून जैन यांना जबाबदारी देण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी मंगळयान, चंद्रयान - २, चंद्रयान -३ सह याव्यतिरिक्त अनेक मोहिमेत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. 

५० दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रयान-३ हे  चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. चंद्रयानचा एक रोव्हर (छोटा रोबोट) बाहेर येईल. तो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याचं स्थान निश्चित केले जाईल. इथेच रोव्हर कोणती खनिजे आहेत, पाणी आहे का? आदींचा शोध घेणार आहे. 
-  संजय देसर्डा, शास्त्रज्ञ, इस्त्रो.

सांगलीच्या संदीप सोले यांनी दिले ‘कवच’

कोटिंग उद्योगात एकमेवाद्वितीय

सांगली : देशासाठी अभिमानाची मोहीम ठरलेल्या ‘चंद्रयान-३’ प्रकल्पात सांगलीच्या उद्योजकानेही सिंहाचा वाटा उचलला आहे. यानाच्या प्रक्षेपणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सुट्या भागांचे कोटिंग (फिल्मिंग) येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजक संदीप सोले यांनी केले आहे.

संरक्षण आणि अवकाश विज्ञान क्षेत्रातील प्रक्षेपक उपकरणांचे अत्युच्च दर्जाचे कोटिंग करणाऱ्या देशभरातील मोजक्याच उद्योजकांपैकी सोले एक आहेत. फ्लुरो पॉलिमर तथा टेफ्लॉन कोटिंगची कामे ते करतात. पंधरा वर्षांपासून इस्रो आणि संरक्षण दलाच्या विविध प्रकल्पांमध्ये त्यांच्या डॅझल डायनाकोटस या उद्योगाचा सहभाग आहे. चंद्रयानच्या तीनही मोहिमा, मंगळ मोहीम, क्षेपणास्त्रे आदींच्या सुट्या भागांचे कोटिंगही त्यांनीच केले. 

विविध अवकाश प्रकल्पांसाठी इस्रो देशभरातील विविध ठिकाणांहून सुटे भाग तयार करून घेते. प्रकल्पस्थळी चाचणी करते. चाचणीत उत्तीर्ण झाल्यावर कोटिंगसाठी आमच्याकडे पाठविले जातात. ‘चंद्रयान -३’साठीचे सुटे भाग लॉकडाऊन काळात कोटिंगसाठी सांगलीला आले होते. शुक्रवारच्या चंद्रयान प्रक्षेपणात त्यांचा वापर झाला. यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे उद्योजक निश्चित केले जातात. आम्ही २००७ पासून गुणवत्तेच्या जोरावर निविदेद्वारे कामे मिळविण्यात यशस्वी ठरलो आहोत.
- निहार सोले, उद्योजक - सांगली

शेजबाभूळगावचा लेक  इस्राेचा उपसंचालक!

लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : चंद्रयान - ३ मोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावणारे शास्त्रज्ञ मल्लिकार्जुन पाटील हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील शेजबाभूळगावचे आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एवढ्या मोठ्या मोहिमेत काम करण्याची संधी सोलापुरातील मल्लिकार्जुन पाटील यांना मिळाली आहे.
आयआयटीमधून शिक्षण झाल्यानंतर मल्लिकार्जुन पाटील हे इस्राेच्या सेवेत रुजू झाले. इस्राेमध्ये त्यांचे सेवेचे हे ३२ वे वर्ष आहे. सध्या ते इस्रोच्या केरळमधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम येथे शास्त्रज्ञ तसेच उपसंचालक या पदावर काम करत आहेत. इस्रोमध्ये इंजिनिअर म्हणून सुरू झालेला प्रवास उपसंचालकपदापर्यंत सुरूच आहे.

मल्लिकार्जुन महादेव पाटील हे मूळचे शेजबाभूळगाव (ता. मोहोळ) येथील आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, शेजबाभूळगाव, तर दहावीपर्यंतचे शिक्षण भैरवनाथ विद्यालय, अंकोली येथे झाले. त्यानंतर त्यांनी जैन गुरुकुल महाविद्यालय येथे अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले. अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. पुढे आयआयटी खरगपूर येथून एम. टेक. व मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. मिळविली. मल्लिकार्जुन पाटील यांचे वडील शेती करत असत. घरची आर्थिक परिस्थिती तशी फारशी चांगली नव्हती; पण शिक्षण व जिद्दीच्या जोरावर मल्लिकार्जुन पाटील यांनी प्रगती केली. आपल्या कामासोबतच कुटुंबाचाही विचार केला. लहान भावंडांच्या शिक्षणात मदत केली. सध्या त्यांचे बंधू उच्च पदस्थ अधिकारी आहेत.

Web Title: Chandrayaan 3 in Maharashtra; Solapur, Sangli and Khandeshputra rhythm heavy work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.