उद्धव ठाकरेंना 'खुर्ची' महत्वाची; शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही पडलेलं नाही : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 17:16 IST2020-10-12T17:14:32+5:302020-10-12T17:16:54+5:30
कृषी कायद्यांचे स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळे, बहिरे झाले आहे.

उद्धव ठाकरेंना 'खुर्ची' महत्वाची; शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही पडलेलं नाही : चंद्रकांत पाटील
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फ़क्त खुर्ची महत्वाची आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे काहीही पडलेले नाही. त्यांना शेतीमधले काहीही कळत नाही. मोदी सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत राज्यभर होत असताना हे सरकार शेतकरी हिताच्या आड येत असून आंधळे, बहिरे झाले आहे. अशी टीका प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
दौंड तालुक्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून या तीन कृषी कायद्याचे स्वागत बळीराजा सन्मान, ट्रक्टर पूजन व रॅली काढून करण्यात आले. पुढे या रॅलीचे चौफुला येथे सभेत रुपांतर झाले. भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, आमदार सुजितसिंह ठाकुर, आमदार राहुल कुल, गणेश भेगडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, मकरंद कोरडे, सुधीर दिवे, आनंदराव राऊत, धर्मेंद्र खांडरे यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, राहुल गांधींनी ट्रक्टर जाळून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यांना शेती म्हणजे काय हेच समजत नाही. शेतकऱ्यांचा अपमान केला असून त्यांच्या ट्रॅक्टर, नांगर हे शेतकऱ्यांच्या जीवनाचे साधनं आहेत. हे ते विसरले. या विधेयकांना पाठिंबा देत असून गांधींना इशारा देतोय की शेतकरी विधेयकांना विरोध करू नका. काहीं दिवसांपूर्वी या कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांना दिल्लीवरुन मॅडमचा रेटा आल्याने केवळ खुर्ची टिकवण्यासाठी कायद्याला स्थगिती दिली गेली. परंतु केंद्राचा कायदा श्रेष्ठ ठरत असतो. अशी कायद्याला स्थगिती देता येत नाही. मुळातच ठाकरेंना कायदा कळतो का हा प्रश्न आहे. ते या कायद्याला स्थगिता का देत आहेत? कृषि उत्पन बाजार समितीला केवळ सेस गोळा करण्याचे काम आहे. सेस बंद होणार असल्यानेच यांच्या पोटात दुखत आहे. सेस गोळा करणे बापाची पेंड आहे काय. शेतकऱ्यांना फायदेशीर असणाऱ्या कायद्यांना विरोध करून शेतकरी गरीब राहिला पाहिजे अशी त्यांचा धारणा आहे.
या कायद्याच्या प्रसारासाठी शिवार सभा घेणार असून पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनाचे आणि आभाराचे पत्र लिहून घेणार आहोत. असे पाटील यांनी सांगितले.