महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 06:32 IST2025-10-06T05:47:23+5:302025-10-06T06:32:20+5:30
नुकसानीचा सविस्तर अहवाल मिळताच निधी देणार, लोणी, कोपरगावात सहकार मेळाव्यांना उपस्थिती

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी (अहिल्यानगर) : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. याबाबत राज्य शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार तत्काळ शेतकऱ्यांना भरीव मदत करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी येथे दिली.
लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ शाह यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांसह राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, बाबासाहेब पाटील, जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा समारंभ आयोजित केला होता.
शाह म्हणाले, केंद्र सरकारने २०२५-२६ मध्ये ३ हजार १३२ कोटींची मदत मंजूर केली आहे. त्यापैकी एप्रिलमध्ये १ हजार ६३१ कोटींचे वाटप करण्यात आले असून, यात महाराष्ट्रासाठी २१५ कोटींचे विशेष मदत पॅकेज देण्यात आले आहे.
ते बनिया नाहीत, पण बनियापेक्षा कमी नाहीत
शाह म्हणाले, राज्य सरकारमधील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यापैकी कोणीही बनिया नाही. मात्र, ते बनियापेक्षा कमी नाहीत. तिघांनीही माझ्याशी चर्चेदरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र काय मदत करणार? अशी हळूच विचारणा केली. त्यावर उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.
‘तातडीने प्रस्ताव द्या’
पुणे : राज्य सरकारने लवकरात लवकर अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे द्यावा. मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधितांशी बोलावे आणि हा निधी घेऊन त्याचे वाटप सुरू करावे, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.
मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
शाह यांचे शनिवारी रात्री उशिरा शिर्डी येथे आगमन झाले. तेथे एका हॉटेलमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासमवेत चर्चा केली.
सुमारे पाऊण तास त्यांची
बंद खोलीत चर्चा होती. शहा यांच्यासोबत तिघेही एकत्र होते. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही.
दिवाळीपासून स्वदेशीचा नारा द्या : देशातील १४० कोटी लोकांनी विदेशी वस्तू खरेदी करणार नाही, असा संकल्प केल्यास भारत महासत्ता बनेल. या दिवाळीपासून स्वदेशीचा अवलंब करा, असे आवाहनही शाह यांनी केले.