केंद्रीय पथक उद्यापासून करणार नुकसानीची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:21 IST2019-11-21T03:01:26+5:302019-11-21T06:21:05+5:30
राज्यात अतिवृष्टीने झालेल्या पीकहानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २२,२३ आणि २४ नोव्हेंबर रोजी दौऱ्यावर येत आहे.

केंद्रीय पथक उद्यापासून करणार नुकसानीची पाहणी
मुंबई : राज्यात अतिवृष्टीने झालेल्या पीकहानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक २२,२३ आणि २४ नोव्हेंबर रोजी दौऱ्यावर येत आहे. औरंगाबाद विभागात डॉ. व्ही. तिरुपुगल आणि डॉ. मनोहरन, नागपूर आणि अमरावती विभागात डॉ. आर. पी. सिंग तर नाशिक विभागात दीनानाथ आणि डॉ. सुभाषचंद्र हे अधिकारी पाहणी करतील. त्यानंतर हे पथक पीकहानीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करेल.
राज्यात अवकाळी पावसाने ९० लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यपालांनी हेक्टरी ८ हजार रुपयांपर्यंतची मदत जाहीर केली आहे, ती केवळ दोन हेक्टरपर्यंत असेल. शिवाय, बागायती शेतीसाठी १३५०० रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत दोन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे. तथापि, नुकसान खरीप पिकांचे झाले असून, ९० टक्के पिके कोरडवाहू असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपयेच मदत मिळेल. दोन हेक्टरच्या मर्यादेमुळे ती १६ हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल. ही मदत तोकडी असल्याची टीका सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतीतून लागवडीचाही खर्च निघणार नाही, अशी भावना आहे.
नंतरच केंद्राची मदत
सध्या जी मदत जाहीर झाली आहे ती राज्याच्या तिजोरीतून दिली जाणार आहे. केंद्राने अद्याप एक पैसाही दिलेला नाही. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकार मदत जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.