पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणारच - सुधींद्र कुलकर्णी

By Admin | Updated: October 12, 2015 12:51 IST2015-10-12T12:20:19+5:302015-10-12T12:51:52+5:30

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित वेळेनुसारच होईल अशा शब्दात सुधींद्र कुलकर्णी यांनी शिवसेनेला ठणकावले आहे.

Book release program will be held - Sudheendra Kulkarni | पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणारच - सुधींद्र कुलकर्णी

पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणारच - सुधींद्र कुलकर्णी

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १२ -  शिवसेनेने पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिली असली तरी हा पूर्वनियोजित वेळेनुसारच होईल अशा शब्दात सुधींद्र कुलकर्णी यांनी शिवसेनेला ठणकावले आहे. विरोध होण्याची शक्यता असतानाही कसुरी मुंबईत आले यासाठी मी त्यांचा आभारी आहे असेही त्यांनी म्हटले आहे. 

सोमवारी संध्याकाळी वरळी येथे पाकचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध असून सोमवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली होती. या घटनेमागे शिवसेनेचा हात असल्याचा आरोप कुलकर्णींनी केला असून या घटनेनंतर कुलकर्णी आणि कसुरी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेने माझा नव्हे तर तिरंग्याचा अपमान केला आहे असा आरोपही त्यांनी केला. कार्यक्रम रद्द झाल्यास आमचा पराभव होईल आणि आम्हाला पराभूत व्हायचे नाही, हा कार्यक्रम होणारच असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

तर पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांनी कुलकर्णींवरील शाईहल्ला दुर्दैवी व निराशाजनक असल्याचे सांगितले. मी राजकीय कार्यकर्ता आहे, राजकीय विरोध समजू शकतो पण तो शांततामय मार्गानेच व्हायला हवा असे कसुरी यांनी नमूद केले. माझे वडिल मुंबईत शिकले, मुंबईशी माझे संबंध असून मी लढण्यासाठी नव्हे तर शांततेचा संदेश घेऊन मुंबईत आलो आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांमधील गैरसमज दूर करण्याची गरज आहे, पाकिस्तानमधील सर्वसामान्यांना भारतासोबत चांगले संबंध असावे असे वाटते, जनतेच्या मनात विष नसते, पण नेतेच लोकांच्या मनात विष पसरवतात असा दावाही त्यांनी केला. 

Web Title: Book release program will be held - Sudheendra Kulkarni