पुस्तक चर्चा: तुमचं आरोग्य तुमच्या(च) हाती ठेवण्याची सहा सूत्रे, डॉ. अभय बंग यांची मुलाखत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 20:24 IST2026-01-30T20:22:03+5:302026-01-30T20:24:37+5:30
Abhay Bang Latest Interview: आजार होण्याआधी आरोग्य जपणे आणि आजार झालाच तर उपचार जवळ, स्वस्त किंवा मोफत मिळणे ही 'आरोग्य स्वराज्या'ची संकल्पना आहे.

पुस्तक चर्चा: तुमचं आरोग्य तुमच्या(च) हाती ठेवण्याची सहा सूत्रे, डॉ. अभय बंग यांची मुलाखत
प्रश्न - ‘आरोग्य स्वराज्य’ ही संकल्पना कशी सुचली?
डॉ. बंग - आरोग्य हा प्रत्येकाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. पण मरणाच्या दारात पोहोचल्यानंतरच आरोग्याचा विचार गंभीरपणे व्हायला सुरुवात होते. महाभारतात तो यक्षप्रश्न प्रसिद्ध आहे. तो असा की जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं? तर युधिष्ठीर म्हणतो की, अवतीभवती प्रत्येक जण मरतो हे बघत असूनही सगळे जण असं मानतात की मरण मला नाहीये ते दुसऱ्याला आहे. तर हा जो प्रश्न आहे की मरणाच्या अगोदरच माझ्या आरोग्याचा विचार मी कसा करेन, माझ्या आरोग्याचा सांभाळ मी कसा करेन? विज्ञानाने आता संभव केलेलं आहे की आपण शंभर वर्ष जगू शकू. पण आपण जगत नाही शंभर वर्षं... आणि जगलो तरी अनेक आजारांसकट कुथत कुथत जगतो. तर 'आरोग्य-स्वराज्य' हा शब्द याच्या मागे आरोग्याच्या विषयाला स्वराज्याचा विचार लावण्याचा माझा प्रयत्न आहे. स्वाभाविकतः याच्यात दोन भाग आहेत. मला एकदा महात्मा गांधींचे नातू स्वर्गीय रामचंद्र गांधी यांनी प्रश्न विचारला की आरोग्याची भारतीय व्याख्या सांग... आणि मला सुचली नाही. माझ्या अख्ख्या वैद्यकीय शिक्षणात भारतीय व्याख्या कधीच नव्हती. ते मला म्हणाले, आरोग्याला काय म्हणतात संस्कृतमध्ये...? मी म्हटलं 'स्वस्थ...' 'तीच त्याची व्याख्या आहे... जो स्व मध्ये स्थित आहे तो स्वस्थ आहे.' तर ही भारतीय व्याख्या मोठी महत्त्वाची आहे. माझ्यासाठी तो एक युरेका क्षण होता. आरोग्य म्हणजे वैद्यकीय उपचार असं सहसा लोकही बघतात आणि मीही डॉक्टर म्हणून तसंच बघण्यासाठी प्रशिक्षित होतो. पण स्वस्थ शब्दाची ही नवी व्याख्या जी आहे जी त्या शब्दामध्येच दडलेली आहे. ती असं सांगते, की आपलं आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी ही तुझी स्वतःची आहे. तू स्व मध्ये स्थित पाहिजे. जो दुसऱ्यावर अवलंबून असेल डॉक्टरवर, रुग्णालयावर... तो अ-स्वस्थ आहे. तर 'स्व' मध्ये स्थित राहण्याची जबाबदारी म्हणजे 'स्वस्थ' आणि 'स्वराज्य' हा जो शब्द आहे गांधीजींनी वापरलाय खूपदा... टिळकांनीही वापरला... आणि स्वराज्याची गांधींनी केलेली व्याख्या फार इंटरेस्टिंग आहे. ते असं म्हणाले की, स्वराज्य म्हणजे 'स्व'चं इतरांवर राज्य नाही. माझं इतरांवर राज्य म्हणजे स्वराज्य नाही. माझं स्वतःवर अनुशासन म्हणजे स्वराज्य... तर हे दोन शब्द जर एकत्र आणले आपण की माझं आरोग्य ही माझी जबाबदारी आहे. स्वतःवरच्या अनुशासनाने मी अशा तऱ्हेने जगलो पाहिजे निरोगी पद्धतीने की मी स्वस्थ राहीन. अशा तऱ्हेने मी शंभर वर्षे जगू शकतो. ही मांडणी 'आरोग्य-स्वराज्य' या शब्दाद्वारे आणि या पुस्तकाद्वारे करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
प्रश्न - पारंपरिक सार्वजनिक आरोग्य दृष्टिकोनापेक्षा ती नेमकी कुठे वेगळी ठरते?
डॉ. बंग - प्रचलित आरोग्य व्यवस्था सध्या दुर्दैवाने आता फक्त आजारांचा उपचार या पद्धतीनेच प्रकट होते. लोकही तसंच बघतात आणि आरोग्य व्यवस्थाही स्वतःला असंच बघते की लोक आजारी पडले की माझ्या दारी येतील, मी उपचार करेन. आता अडचण अशी झालीय की रोगांचं स्वरुप बदललेलं आहे आणि असे रोग व्हायला लागले हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, लकवा, की आयुष्यभर दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे त्याला काही मुक्ती नाही एकदा झाल्यानंतर सहसा... आणि दुसरं असं की अतिशय महाग उपचार आहेत. म्हणजे मग आरोग्य व्यवस्थेमध्ये सध्या काय घडतंय... की माणसं कशीही जगतात... आणि मग त्यामुळे रोग निर्माण होतो, तो रोग असाध्य असतो. मग ते आरोग्य सेवेच्या दारी जातात. रोग एकाला, उपचार करणारा डॉक्टर किंवा रुग्णालय दुसराच आणि बऱ्याच वेळा त्याचा पैसा जो आहे तो मेडिकल इन्शुरन्स किंवा शासकीय योजना देतात... म्हणजे रोग एकाला, उपचार दुसरा करतो आणि पैसा तिसराच देतो... याच्यामध्ये रोग टाळण्यामध्ये कुणालाच रस नाही. म्हणून आजची आरोग्य व्यवस्था ज्या तऱ्हेने रचलेली आहे, तिची अर्थरचना त्याच्यामधून आरोग्याचं रक्षण आणि आरोग्याचं संवर्धन फार कमी होतं. म्हणून आरोग्य स्वराज्यमध्ये मी असं म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे की व्यक्तीने शक्यतो आरोग्य रक्षण या पद्धतीने जगावं आणि आजारी पडल्यास त्याला योग्य उपचार जवळात जवळ आणि स्वस्त किंवा निशुल्क मिळावा. व्यक्ती, समुदाय आणि शासन या तिघांचं धोरण असं असावं की ज्याच्यात आरोग्य स्वराज्य साध्य होईल. हे पारंपरिकपेक्षा अशा तऱ्हेने वेगळं आहे.
प्रश्न - गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील आपल्या कामातून ‘स्वराज्य’ या विचाराला कोणती ठोस रूपे मिळाली?
डॉ. बंग - या प्रश्नाचं मी दोन भागात विभाजन करतो. गडचिरोलीमध्ये आरोग्य स्वराज्यचं प्रकटीकरण... तर एक भाग जो आहे त्याचं उदाहरण म्हणून मी घेईन... कारण चाळीस वर्षाचा प्रवास आहे.. तो इतक्या इतक्या थोडक्यात सांगणं शक्य नाही. पण दोन भागात करेन... गडचिरोलीमध्ये आदिवासी भागामध्ये बालमृ्त्यू खूप होते. बालमृत्यू होण्याची प्रमुख कारणं - लहान मुलांचा न्यूमोनिया आणि नवजात बालकांचे मृत्यू... गावागावामध्ये डॉक्टर नाहीत. एक्स-रे, स्टेथोस्कोप नाहीत, नवजात स्पेशालिस्ट युनिट नाहीत. मग मुलं कशी वाचवायची? भारतात त्यावेळी अशी २५ लक्ष मुलं दरवर्षी मरत होती. गडचिरोली ही आमची छोटी प्रयोगशाळा... गडचिरोलीच्या जवळपास ४० गावांमध्ये प्रयोग करून आम्ही अशी पद्धत विकसित केली की याच्यामध्ये डॉक्टर नाही तरी गावातली मुलं कशी वाचवता येतील? तर गावातल्याच एका साक्षर बाईला निवडून तिला योग्य प्रशिक्षण, उपकरणं आणि औषधं देऊन ती गावातल्या जीवघेण्या रोगांचा उपचार करून किंवा बालकांचा सांभाळ करून बालमृत्यू कमी करू शकते आणि ते वैज्ञानिक प्रयोगांनी आम्ही दाखवलंच की जे यशस्वी होते, ज्याच्यामध्ये जो अर्भक मृत्यूदर... हजार मुलं जन्माला आली तर वर्षभरात किती मरतात, त्याला म्हणतात अर्भक मृत्यू दर... की जो १२१ होता तो कमी होता होता आता १६ वर आलेला आहे. तर हा चमत्कार एका गावातल्या बाईला सक्षम करून ही बालमृत्यू कमी करण्याची शक्ती गावामध्येच देता येते. हे झालं गावपातळीवरचं आरोग्य स्वराज्य... ते साध्या साध्या अर्धशिक्षित बाईला करता यावं. न्यूमोनियाचा उपचार निरक्षर बाईला करता यावा म्हणून एक ब्रेथ काउंटर श्वासमापक नावाचं एक साधं उपकरण आम्ही बनवलं आणि त्या उपकरणाद्वारे निरक्षर बाई देखील न्यूमोनियाचा उपचार करू शकते. तर अशा तर्हेने ज्ञानशक्ती आणि उपचारशक्ती ही गावामध्येच जर गेली तर त्यांना डॉक्टर कुठे दूर शहरात आहे, फी खूप आहे, एक्स-रे लागतो, या सगळ्यांची गरज पडत नाही. आणि गावातच अगदी अर्ली स्टेजला रोगांचा उपचार होऊ शकतो, हे वैज्ञानिक पद्धतीने आम्ही सिद्ध केलं. त्यामुळे ही बालमृत्यू कमी करण्याची पद्धत आणि ती कम्युनिटी हेल्थ वर्कर, ग्राम आरोग्य कार्यकर्तीच्या मार्फत ही पद्धत भारत सरकारने स्वीकारली. भारत सरकारने आशा कार्यक्रमात त्याचा अंतर्भाव केला. भारतातल्या आशांचं यासाठी प्रशिक्षण करण्याची जबाबदारी आम्हाला दिली. १० लक्ष आशांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आम्ही उभी केली. आज गावागावांमध्ये ही आशा कार्यकर्ती उपस्थित आहे. तर गडचिरोलीच्या प्रयोगशाळेतून किंवा प्रयोगक्षेत्रातून आरोग्य स्वराज्याच्या दिशेने म्हणजे आरोग्य सांभाळण्याची क्षमता गावामध्येच देण्याचा हा एक प्रयोग झाला आणि अतिशय यशस्वी असा त्याचा व्यापक परिणाम भारतात झाला. जगभरात १८० देश आता याचा उपयोग करतात. दुसरं आता या आरोग्य स्वराज्यचा जो शोध आहे तो थोडा व्यक्तिगत पातळीवर आहे. गडचिरोलीतच काम करताना १९९० साली वयाच्या ३९ व्या वर्षी मला हार्ट अटॅक आला. आणि खाडकन माझे डोळे उघडले. की जरी मी समाजसेवा करतो असलो तरी वैद्यकीय नियमांना मी काही अपवाद नाही... आणि मी माझ्या जीवनशैलीकडे दुर्लक्ष केलं होतं... आणि त्यामधून मला हृदयरोगातून बाहेर कसं येता येईल किंवा नीट जगता कसा येईल याचा शोध घेण्यामधून माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पहिलं पुस्तक निघालं. ते बऱ्यापैकी व्यापक वाचलं गेलंय म्हणून त्याची पुनरावृत्ती मी आता करत नाही. पण १९९० मध्ये पहिल्यांदा हार्ट अटॅक आला तिथून ३५ वर्षं अजूनही मी जिवंत आहे आणि सक्रीय आहे. तर व्यक्तीच्या पातळीवरती आपण आपल्या आरोग्यामध्ये काय बदल करावे, आरोग्य जीवनशैलीमध्ये काय बदल करावे आणि निरोगी जीवनशैलीचा शोध आणि त्यातून मी काय अमर नाही झालेलो... पण किमान ३५ वर्षं मला वाढीव आयुष्य मिळालं आणि अजून मी सक्रीय आहे. ही प्रत्येकासाठीच आरोग्य स्वराज्याची दुसरी बाजू आहे की आपण स्वतःच्या जीवनात काय करू शकतो? तर हे दोन्ही शोध गडचिरोलीच्या जंगलामध्येच असताना लागले. आरोग्य स्वराज्यमध्ये दोन्ही आहे की माझ्या जगण्यातली सांस्कृतिक क्रांती, निरोगी जगण्याची सांस्कृतिक क्रांती, आणि दुसरं की गावामध्ये ज्याला गरज आहे त्याला आरोग्य सेवा निःशुल्क उपलब्ध करून देण्याची व्यवस्था दोन्ही मिळून झालं गडचिरोलीतलं आरोग्य स्वराज्य.
प्रश्न - आरोग्य हे केवळ वैद्यकीय उपचारांचे क्षेत्र न राहता लोकसहभागावर आधारित चळवळ कशी बनू शकते याचा अनुभव तुम्ही पुस्तकातून मांडला आहे, पण हा लोकसहभाग देशभरात सर्वत्र व्यापक प्रमाणात प्रत्यक्षात कसा येऊ शकेल असे वाटते?
डॉ. बंग - हा शब्द जो तुम्ही वापरलात चळवळ... आणि भारतामध्ये स्वातंत्र्य आंदोलनापासून नंतर विविध समाज परिवर्तनाच्या चळवळी झाल्यात. सहसा चळवळ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असं येतं की हजारो माणसं भाग घेतायत किंवा रस्त्यावर, मैदानात गोळा झालेली आहेत.. वगैरे वगैरे... आता असं झालंय की चळवळींचं स्वरुप बदललंय. आणि जसं समाजाच्या इतर बाबतीत झालं की सामूहिकतेकडून माणसं व्यक्तिवादी झाली, व्यक्तिकेंद्रीत अधिक झाली पूर्वीच्या तुलनेमध्ये... तसं समाज परिवर्तनाच्या चळवळींचंही खरं म्हणजे रूप बदललंय... जरी सामाजिक कार्यकर्त्यांना ते अजून पुरेसं पचनी नाही पडलेलं... पण ते रूप असं बदललंय की व्यक्ती म्हणजे चळवळी देखील आता या व्यक्तीच्या पातळीवर जास्त व्हायला लागल्यात. परिवर्तनं जी होतात ती व्यक्तीच्या पातळीवर होतात. आणि म्हणून व्यक्ती हा चळवळीच्या बदलाचा, परिवर्तनाच्या बदलाचा युनिट, एकक हा आता जास्त मोठ्या प्रमाणात व्यक्ती झालाय. तर व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन हे चळवळींचं नवं रूप आहे. ते एकमेव आहे असं नाही. सामूहिक चळवळी होतात, होतच राहतील... पण त्याचा लंबक जो आहे तो व्यक्तीवरच अधिक जास्त केंद्रीत आहे. आणि विज्ञानामुळे आणि वैज्ञानिक युगात माहिती झपाट्याने पसरण्याच्या संभावना आता निर्माण झाल्या आहेत. पूर्वी फक्त सुशिक्षित माणसंच वाचू शकायची, आता मोबाइल फोन, यू् ट्युब, इंटरनेट या सगळ्यांच्या द्वारे घराघरांमध्ये आरोग्याची माहिती पोहोचण्याची संभावना निर्माण झालीय. आणि त्यामुळे माणसं हळूहळू जास्त आरोग्याच्या बाबतीत परिवर्तन करायला लागलीयत. माणसं चालायला लागलीयत. माणसं आहारामध्ये फायबर आहे की नाही हे बघायला लागलेली आहेत. तर ही एक प्रकारची आरोग्य सांस्कृतिक क्रांती आहे. आणि तिचा घटक हा व्यक्ती आहे. त्याचा संकल्प आहे, त्याचं जगणं आहे म्हणून माझं रोजचं जगणं हीच एक नवी क्रांती आहे. आणि चळवळींचं रूप या तऱ्हेने बदलतंय. की बदल हे व्यक्ती व्यक्तींमध्ये, व्यक्तींच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात घडू शकतात. आणि ही एक चळवळच होते की...! जरी ही सगळी माणसं मिळून काय एक संघटना नसते, त्यांचा एक कुणी नेता नसतो, पण एक मोठी सांस्कृतिक क्रांती घडून जाते. दुसरं असं की, चळवळीचं दुसरं जे रूप झालं मी उदाहरण दिलं की जेव्हा अशा प्रकारची परिवर्तनं वैज्ञानिक पुराव्यासकट निर्माण केली जातात, जसं गडचिरोलीच्या प्रयोगांमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला. तर त्यातून जी ज्ञानाची शक्ती निर्माण होते, वैज्ञानिक पुरावा निर्माण होतो त्याचा खूप व्यापक परिणाम होतो. आणि म्हणून उदाहरणार्थ आशा ही कल्पना आणि त्याच्या मार्फत पोहोचणाऱ्या, व्यापक प्रमाणात पोहोचणाऱ्या आरोग्य सेवा गावागावांमध्ये हा एक पुरावा आहे की चळवळींचं रूप बदललं आहे... आणि आशाच्या मार्फत जी आरोग्य सेवा आता कोविडच्या काळात आपण पाहिलं की जर आशा नसती तर खेड्यांचं काय झालं असतं? त्यांना काय आशाच उरली नसती. तर मी असं मानतो की आशा आणि ती जे काम करते ही देखील आरोग्य क्षेत्रातली क्रांती आहे की निव्वळ डॉक्टर आणि रुग्णालय हेच नाही तर आशाच्या मार्फत घरोघरी आरोग्य परिवर्तन पोहोचू शकतं. आणि तिसरं शासकीय धोरणांमध्ये बदलाची गरज असते निव्वळ व्यक्तीच्या प्रयत्नांनी सर्व काही होत नाही. शासनाची त्याला मदत असायला हवी म्हणूनच शासन व्यवस्था आपण निर्माण केलीय. तर काही परिवर्तनं शासकीय धोरणातही व्हावी लागतात. त्यासाठी मात्र कधी वैज्ञानिक पुरावा कामी येतो, किंवा प्रत्यक्ष कधी मीडियामधून किंवा राजनैतिक चळवळींची गरज पडते. साधं उदाहरण द्यायचं तर जगामध्ये आता मृत्यू आणि रोग निर्माण करणारी जी सगळ्यात मोठी कारणं आहेत त्यात दारू आणि तंबाखू ही दोन्ही आहेतच. त्याचा वैज्ञानिक पुरावा सबळ आहे. पण शासन तंबाखू आणि दारू कमी करण्यासाठी सहसा शासकीय धोरणं प्रभावी नाहीयेत. कारण त्यांना उगाच लोकांना नाराज करायचं नाही. आणि एक मोठं आर्थिक साम्राज्य त्याच्यात दडलेलं आहे. जोपर्यंत याची व्यापक मागणी होत नाही तोपर्यंत शासनावरती हे धोरण बनविण्याचं किंवा धोरण बदलविण्याचं दडपण येणार नाही. म्हणून चळवळींच रूप या अर्थाने बदललंय की ते जास्त व्यक्तीकेंद्रीत परिवर्तनं होताहेत. तर त्यासोबतच समुदाय केंद्रीत परिवर्तनं म्हणजे आशा आणि शासकीय धोरणात परिवर्तनाची गरजं आहे त्यासाठी दबाव निर्माण व्हायची गरज आहे.
प्रश्न - प्रचार तंत्र विरुद्ध स्व तंत्र यामधील आरोग्याची लढाई आहे, कंझ्युमर क्रांती आपण आरोग्यासाठी करू शकतो, असे आपण म्हणता, ते कसे?
डॉ. बंग - आपलं आरोग्य ज्याच्यावर अवलंबून आहे त्यात आहार हा एक अगदी महत्त्वाचा भाग आहे. आपण काय खातो, काय पितो, दिवसभरामध्ये तीन ते पाच किलो अन्न आणि द्रव पदार्थ आपण आपल्या पोटात टाकतो. म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये घेतो, पण आपण काय घेतो आहोत तर आपण जे घेतो आहोत ते काही प्रमाणात घरातल्या पारंपरिक सवयींनी ठरतं, पण मोठ्या प्रमाणात आता ते बाजारांमध्ये काय प्रचलित केलं जातं किंवा लोकप्रिय केलं जातं आणि बाजारांमध्ये काय लोकप्रिय केलं जातं हे प्रचारतंत्रावर, जाहिराती याच्यावर ठरतं आणि म्हणून मग विविध प्रकारची अशी आहार पद्धती आणि खाद्यपदार्थ लोकप्रिय केले जातात की जे वस्तुतः आरोग्याला घातक आहेत. सगळी शीतपेयं, भरपूर त्याच्यामध्ये शुगर असते, प्रोटीन काहीच नसतं, आरोग्याला घातक आहेत ती... अनेक प्रकारचे सॅच्युरेटेड फॅट्स किंवा ट्रान्स फॅट्स असलेल्या मिठाया किंवा तळलेले पदार्थ किंवा पिझ्झा, बिस्किटं, बेकरी, हे सगळे जे पदार्थ आहेत ते आपल्याला मोहक स्वरुपात बाजारात मांडले जातात. ते आपण खावे म्हणून मोठमोठ्या जाहिराती येतात, बिलबोर्ड्स येतात, एवढंच नाही तर टीव्ही आणि सोशल मीडियावरती मोठमोठ्या नटनट्या त्याचा प्रसार करतात... आणि असं करून आपल्याला कळत नाही की आपल्या आवडीच्या खाण्याची निवड आपण नाही करत आहोत... ती निवड आपल्यासाठी केली जात आहे आणि आपण... जणू स्टॉल फिडिंग आपलं होतंय. अमेरिकेमध्ये गुरांना चरण्याचं स्वातंत्र्य नसतं, त्यांना बांधून ठेवलेलं असतं, आयुष्यभर तिथेच बांधलेलं असतं, त्यांना जे दिलं जातं ते खातात, आणि एक दिवशी त्यांना कत्तलखान्यामध्ये कापून खाल्लं जातं. तर आपणही जणू काही समाजामध्ये हळूहळू स्टॉल फिडिंग आपलं होतंय. आपण काय खायचं याचा निर्णय बाजार आणि प्रचारतंत्र करतायत... आणि आपण जणू काय ते आपला चॉइस आहे असं समजून त्या भ्रमामध्ये आपण ते खात सुटलो आहोत. तर जे खाण्याच्या बाबतीत तेच नेसण्याच्या बाबतीत तेच आपण चालायच्या ऐवजी... आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकसंख्या १२ लक्ष आणि वाहनं झालेली आहेत आता २ लक्ष... कोण चालतंय...? सायकल आता कोण चालवत नाहीत, बैलगाड्या दिसत नाहीत... जेवढा व्यायाम माझ्या जीवनातून निघून जाईल तेवढा मी आजारी पडेन... पण आता मोबाइल फोन, इंटरनेट आणि टीव्ही याच्यामुळे लोकांना घरबसल्या खुर्चीवर बसून मनोरंजन घरबसल्या, खाण्याचे पदार्थ घरबसल्या आणि मग आजारी पडले तर मेडिकल मार्केटमध्ये जा आणि हॉस्पिटल नावाच्या दुकानातून उपचार विकत घ्या. तर अशा प्रकारचं हे जे आपलं जीवन झालेलं आहे. म्हणजे आपण जणू काही फक्त कंझ्युमर झालेलो आहोत एका मोठ्या व्यवस्थेचे... खाद्य व्यवस्था, व्यायाम व्यवस्था किंवा श्रम व्यवस्था आणि उपचार व्यवस्था, तर त्याच्या ऐवजी खरं म्हणजे आपण कंझ्युमर आहोत आपण स्व स्थ व्हायला पाहिजे. आपण पर स्थ झालो आहोत किंवा अ स्वस्थ झालो आहोत. याच्या ऐवजी आपण स्व स्थ झालं पाहिजे. अन् ते व्हायचं असेल तर महात्मा गांधींचे जे प्रसिद्ध स्लोगन आहे, बी द चेंज युवरसेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड... परिवर्तनाची सुरुवात माझ्यापासूनच व्हायला पाहिजे. तर माझं रोजचं जगणं हीच मुळी क्रांतीची किंवा परिवर्तनाची सुरुवात आणि त्या अर्थाने ती कंझ्युमर क्रांती आहे.
प्रश्न - महिलांचे आरोग्य, बालमृत्यू, कुपोषण, हृदयरोग यांसारख्या मुद्द्यांवर ‘स्वराज्य’ दृष्टिकोनातून कोणते उपाय अधिक प्रभावी ठरतील?
डॉ. बंग - बालमृत्यूच्या बाबतीत मी उल्लेख केलाच, पण हृदयरोगाच्या बाबतीत थोडासा अधिक विस्तार करतो. एकेकाळी समाजामध्ये मलेरिया, टीबी, कॉलरा हे रोग जास्त व्यापक होते आणि त्यामुळे मृत्यू होत होते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरासरी आयुर्मान ३० वर्षं होतं. आता सरासरी आयुर्मान ७० वर्षं झालंय. आणि माणसं जास्त जगतायत पण ती रोगांसकट जगतायत. आता मलेरिया, टीबीच्या ऐवजी ब्लड प्रेशर, मधुमेह, हृदरोग, लकवा, कॅन्सर आणि मानसिक रोग वाढलेत आणि कदाचित निम्म्याहून अधिक लोकसंख्येला वयस्क लोकसंख्येला यापैकी कोणता ना कोणता तरी रोग आहे. तर हे जे रोग आहेत, ज्यांना आम्ही वैद्यकीय भाषेत असंक्रामक रोग म्हणतो, हे एकदा झाले की सहसा दुरुस्त होत नाहीत. तुमच्यासोबत कायम राहतात. नंबर दोन यांचे उपचार अतिशय महाग आहेत. आणि उपचार पद्धतीने-मार्गाने याचं जर नियंत्रण करू म्हटलं तर काय होतं की याचं क्लासिक उदाहरण अमेरिका आहे. अमेरिकेमध्ये मुख्यतः याच पद्धतीची आरोग्य व्यवस्था आहे. तु्म्ही वाट्टेल ते खा, वाट्टेल तसे जगा आणि मग रुग्णालयात या, मेडिकल इन्शुरन्स तुमचे पैसे भरेल.. ज्याचा परिणाम असा आहे की अमेरिकेमध्ये आज प्रतिव्यक्ती म्हणजे अख्ख्या लोकसंख्येला प्रतिव्यक्ती प्रतिवर्ष आरोग्याचा खर्च १० लक्ष रुपये आहे. भारतामध्ये पाच-सहा हजार रुपये आहे. त्यामुळे १० लक्ष रुपये प्रतिव्यक्ती प्रतिवर्ष खर्च करणाऱ्या आरोग्य व्यवस्थेचं मॉडेल आपण भारतामध्ये त्याची नक्कल करून काही उपयोग नाही. १४० कोटी लोकांना आरोग्य व्यवस्था जी द्यायचीय तर म्हणून कसं हे करता येईल? तर... निरोगी पद्धतीने मी जगलो.. हे रोग मला होऊच नये असा प्रयत्न पाहिजे. त्यासाठी सहा सूत्रं मी सुचवतो. ही काही मी शोधून काढलेली नाहीत. ही विज्ञानामधून आलेली आहेत. पण पहिली गोष्ट की, आहारामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स संपृक्त असलेले जे फॅट्स आहेत, स्निग्ध पदार्थ विशेषतः जे मांसाहारामध्ये असतात आणि दूध, तूप, लोणी याच्यामध्ये जास्त असतात. तर सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण अगदी कमी हवं. आहारामध्ये फायबरचं प्रमाण जास्त हवं आणि रोजच्या आहारामध्ये किमान पाच भाज्या आणि फळं हवीत. कार्बोहायड्रेट जे अतिरेकी असतं भारतीय आहारामध्ये त्याचं प्रमाण कमी करायला पाहिजे. असं जर का झालं तर... पहिली गोष्ट म्हणजे आहारामध्ये परिवर्तन, दुसरं म्हणजे मी अगोदरच उल्लेख केला की रोग निर्मिती करण्यामध्ये आता दारू आणि तंबाखू याचा व्यापक हातभार लागतोय. असं म्हणतात की कॅन्सर जेवढे जगभरात आहेत, त्यातले जवळपास ५० टक्के कॅन्सर हे तंबाखूशी संबंधित आहेत. तर दारू आणि तंबाखू या दोन गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःला अलग ठेवणं, मुक्त ठेवणं... तिसरं... खरं म्हणजे मानवी शरीर बनलं आहे त्याचं जवळपास निम्मं वजन हे स्नायूंचं आहे. या स्नायूंना जर आपण नुसतंच त्यांना काहीही कर्म न करता ठेवलं तर मग ते कुजतात आणि मग त्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये रोज काही ना काही तरी श्रम हवं... मग सगळ्यात सोपा उपाय म्हणजे चालणे... रोज तीस ते चाळीस मिनिटं चालणे किंवा त्याच्या समकक्ष श्रम आपल्या जीवनात पाहिजे... खरं म्हणजे बगीचात काम करणे, घरकाम करणे हे देखील ते उपाय असू शकतात. चौथा जो भाग आहे तो असा की, आपल्या मनावर खूप ताण आहे. सगळं जीवन इतकं स्पर्धामय झालेलं आहे की पूर्वीची उबदार कौटुंबिक संस्कृती आणि गावामधील समुदाय की ज्याच्यामध्ये आपसी स्पर्धा काही खास नव्हती. एकमेकांना सपोर्ट होता, स्पर्धा कमी होती, शेजाऱ्यासोबत माझी स्पर्धा नव्हती, आता प्रत्येक जण शेजाऱ्यासोबत स्पर्धा, वर्गातल्या मित्रासोबत स्पर्धा आणि मग लग्न झाल्यानंतर नवरा बायकोंची स्पर्धा करिअरसाठी... म्हणून इतका ताण झालाय... आपण असं केलंय की जग, जीवन म्हणजे मी विरुद्ध अख्खं जग... तर मी विरुद्ध अख्खं जग याच्यामध्ये मी हरणार हे स्पष्टच आहे आणि ते हरण्याची लढाई मी लढतोय... जीवन म्हणजे हरण्याची लढाई होतं. आणि काय प्रचंड ताण हो... अख्ख्या जगाला मी स्पर्धक किंवा शत्रू बनवून टाकलं तर माझं काय होईल? चुराडा होईल... त्यामुळे असह्य ताण आणि एकटेपणा सगळेजण भोगतातयत. याच्यामधून रोगही निर्माण होतात, मानसिक रोगही निर्माण होतात, दुःख निर्माण होतं... माणसं ७० वर्षं जगतायत पण रोग आणि दुःखासोबत जगतायत. तर हा ताण कमी करण्यासाठी आपल्या परंपरेमध्ये योग हा सुंदर मार्ग आहे. शवासन, प्राणायाम, ध्यान हे त्यासाठी अतिशय चांगले प्रभावी उपाय आहेत. आणि वस्तुतः आपण जे सगळे एकटे झालेलो आहोत, जगाला आपण अन्य असं कल्पिलेलं आहे, शत्रू कल्पलेलं आहे, स्पर्धक कल्पलेलं आहे, त्याच्या ऐवजी जगासोबत प्रेमाचं नातं निर्माण करणं हा या एकटेपणावरती आणि ताणावरती फार मूलभूत उपाय आहे. मी विरुद्ध जग अशी रचना नाही तर मी या जगाचा भाग अशी रचना असायला हवी. पण माझं मानस तसं नाही घडवलेलं समाजाने... आधुनिक समाजानं मला मी विरुद्ध जग आणि मी जणू काही एकटा उत्तर ध्रुवावर किंवा एव्हरेस्ट जिंकायला निघालेला गिर्यारोहक असं माझं स्वरूप करून टाकलेलं आहे. तर त्याच्या ऐवजी इतरांवर प्रेम... मग ते इतर माझे कुटुंबीय असो, शेजारी असो, मित्र असो, इव्हन प्राणी आणि झाडांवर प्रेम केलं तरी माझी एकटेपणातून सुटका होते. म्हणून प्रेम... आणि सगळ्यात शेवटी असं म्हणेन की माझ्या जीवनाला काही तरी हेतू हवा... नुसतंच खाणंपिणं आणि पगार वाढवणं याच्या पलीकडे जर जीवनाला काही हेतूच नसेल तर मला काही दिवसांनी जीवन निरर्थक वाटायला लागतं. आणि म्हणून सार्थक जीवन हा रोगमुक्तीचा मोठा प्रभावी उपाय आहे. म्हणून माझ्या जीवनाला काही तरी थोडा व्यापक असा हेतू हवा, आणि तो हेतू मिळण्याचा फार सोपा उपाय आहे, अहो इतरांचं दुःख म्हणजे माझ्या जगण्याचा हेतू...! तर मी इतरांचं दुःख दूर करणं याच्यामध्ये माझं एकटेपणही दूर होतं, माझ्या जीवनाला सार्थकता मिळते आणि दुसऱ्यांचं दुःख कमी होतं... तर असा हा सहा कलमी कार्यक्रम आहे. की ज्याच्यातून मी एक उदाहरण घेतलं हृदयरोग... पण आजकालचे सगळेच जे असंक्रामक रोग आहेत त्या बहुतेकांवरती या सहा कलमी जीवनशैलीमधून मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यापासून स्वतंत्र होऊ शकू.
प्रश्न - तरुण कार्यकर्ते, डॉक्टर आणि धोरणकर्त्यांनी या पुस्तकातून नेमके काय घेऊन जावे, अशी आपली अपेक्षा आहे?
डॉ. बंग - समाजाच्या गरजा आणि परिवर्तनाचं रुप बदलतंय हे त्यांनी लक्षात घ्यावं. माझ्या पिढीचे आणि नंतरचे तरुण कार्यकर्ते हे चळवळींच्या द्वारे इतरांना बदलण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यासोबतच आता स्वतःच्या जीवनात परिवर्तन आणि इतरांच्याही जीवनामध्ये त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर परिवर्तन... निरोगी जीवनशैलीचा प्रसार ही एक नवी आरोग्य सांस्कृतिक क्रांती आहे, हे कार्यकर्त्यांनी समजून घ्यावं अशी माझी धडपड आहे. दुसरं असं की पूर्वी निव्वळ घोषणा आणि मोर्चे याच्यातून परिवर्तन करण्याचा प्रयत्न माझ्या पिढीने केला. पण गडचिरोलीच्या आमच्या अनुभवातून मला असं दिसतं की वैज्ञानिक पद्धतींचा वापर याच्यामुळे परिवर्तनाची शक्ती शंभर पटीने वाढते. म्हणून निव्वळ घोषणांच्या ऐवजी वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग आणि वापर आणि तिसरं शासनाला मी असं म्हणेन की, निव्वळ लोकप्रिय घोषणा करून आणि मेडिकल इन्शुरन्सच्या वाढत्या घोषणा करून आरोग्य वाढणार नाही. त्याच्यामुळे निव्वळ उपचार स्वस्त होतील, पण लोक जास्त आजारी पडतील... आता तर सहज आजारी पडतील उपचार फुकटच मिळणारंय म्हटल्यावर... पण असंय की वैद्यकीय इन्शुरन्स हे म्हणजे... एक थोडंसं की विनोदच आहे तो... की तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला जर इन्शुरन्सचे पैसे मिळाले तर... तुम्ही तर काय वाचला नाही... तसंच तुम्ही आजारी पडल्यानंतर मेडिकल इन्शुरन्सचा उपचार फुकट मिळाला पण तुमचं आरोग्य परत नाही मिळालं... म्हणून शासनानं धोरणं अशी वाढवावी की ज्याच्यामध्ये आरोग्याचं रक्षण होईल. सध्याचं शासनाचं धोरण मोठ्या प्रमाणात आजारी पडल्यानंतर उपचाराची सोय... ज्याची गरज आहे, त्याच्या मी विरोधात नाहीच आहे. त्याची गरज आहेच आहे... पण ८० टक्के भाग हा त्याच्या पूर्वी येतो. शहरांमधलं प्रदूषण तुम्ही नाही कमी केलं. दिल्लीमधलं, मुंबईमधलं, पुण्यामधलं... तर आता बघा ती आयएमएफची गीता गोपीनाथ आहे ती असं म्हणाली, अमेरिकेच्या टॅरिफची भारत खूप चिंता करतोय, पण भारतातल्या शहरांमधलं हवा प्रदूषण हे त्याच्याहून जास्त महत्त्वाचंय... तर शासनाला हे हवा प्रदूषण असेल किंवा आहाराबद्दलचे जे विविध प्रकारचे गैरप्रकार समाजामध्ये प्रसृत केले जाताहेत - फास्ट फूड, वेगवेगळे ड्रिंक्स, दारू आणि तंबाखू, या सगळ्यांचं नियंत्रण करण्याचं धोरण शासनाचं असायला हवं. डॉक्टरांच्या बाबतीत मला एक अपील करायचंय खरं म्हणजे... ते अपील असं की डॉक्टर शब्दाचा खरा अर्थ असा होतो की टू टीच... तर डॉक्टर म्हणजे टू टीच... आपण बघा इनडॉक्टरेशन शब्द म्हणतो, म्हणजे कुणाला एखादी विशिष्ट मतप्रणाली समजावणं इनडॉक्टरनेशन म्हणतात... तसा डॉक्टरचा लॅटिन अर्थ आहे टू टीच... पूर्वी काही उपचार प्रभावी नव्हते. डॉक्टर काय करायचे फक्त शिकवू शकायचे. तर आम्ही तो अर्थ विसरलो आहोत. म्हणून डॉक्टरांनी निव्वळ उपचारकेंद्री न राहता रुग्णासोबत जेवढा वेळ डॉक्टरांना मिळतो त्यातला किमान पन्नास टक्के वेळ तरी त्यांनी निरोगी कसं राहावं हे शिकवण्यामध्ये द्यायला पाहिजे. दुसरं मी डॉक्टरांना असं सुचवेन की डॉक्टरांनी स्वतः निरोगी पद्धतीने जगलं पाहिजे कारण ते आदर्श आहेत, लोक त्यांच्याकडे बघतात. ते धूम्रपान करणारा डॉक्टर आणि त्याने दिलेला सल्ला किती प्रभावी ठरेल? तर म्हणून डॉक्टरांनी स्वतः आपल्या जीवनातून आचरणातून दाखवून दिलं पाहिजे... आकडेवारी अशीय की समाजातल्या इतर घटकांपेक्षा डॉक्टर जास्त आजारी पडतात आणि लवकर मरतात... तर डॉक्टरांनी स्वतःलाही वाचवलं पाहिजे आणि त्यांच्या जगण्याकडे इतर लोकांना आदर्श म्हणून बघता यायला पाहिजे. एक कल्पना माझीय की खरं म्हणजे प्रत्येक डॉक्टरने आपल्या नावाखाली एक पदवी लावावी, ती पदवी अशी... की आय एम अ डॉक्टर मग काहीही असो एमबीबीएस, एमडी.. आणि त्याच्याखाली लिहावं आयडीडी... म्हणजे आय डोन्ट ड्रिंक... नुसतं एमबीबीएस किंवा एमडी काय कामाचं... त्यासोबत हेही सांग की तू कसा जगतोस, त्याने घोषणा करावी की आय डोन्ट ड्रिंक... तर डॉक्टरांच्या जगण्यातून खरं म्हणजे समाजासमोर आदर्श निर्माण व्हायला पाहिजे.
प्रश्न - आरोग्य हा मूलभूत हक्क मानला, तर तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सरकारला कोणते कठोर निर्णय घ्यावे लागतील?
डॉ. बंग - आरोग्य हा मूलभूत हक्कही आहे आणि जबाबदारी पण आहे. तो निव्वळ हक्क नाहीये. कारण हक्क आपण दुसऱ्याकडून मागतो... जबाबदारी माझ्यावर असते... जेव्हा टिळक म्हणाले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच... हे जे मिळवणारच ही माझी जबाबदारी आहे की मी ते मिळवून राहीन... तर तसंच स्वास्थ्य किंवा आरोग्य हे खरं म्हणजे निसर्गाने प्रत्येकाला निरोगीच जन्माला आणलेलं असतं अपवाद सोडून देऊ दोन-चार टक्के... पण निसर्ग आपल्याला निरोगीच जन्माला आणतो. आपण त्याच्यानंतर घाण करतो... तर आरोग्य माझा निसर्गदत्त, जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी राखणारच... असा संकल्पही हवा... तर हा एक झाला स्वतःच्या बाबतीत... पण तरी शासनावर ही जबाबदारी येतेच येते... की ज्या लोकांनी शासनाला निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या आरोग्याचं रक्षण करण्याची जबाबदारी शासनावर नक्कीच आहे. म्हणून अगोदरच मी जसा उल्लेख केला, हवेतलं प्रदूषण, बाजारामध्ये असलेले आहाराचे विविध पदार्थ, त्यातले रोगिष्ट पदार्थ एलिमिनेट व्हायला पाहिजेत, दारू आणि तंबाखू, खरं म्हणजे वाहनांचा वापर थोडा कमी आणि शरीराचा वापर जास्त अशा प्रकारची ट्रान्सपोर्ट सिस्टिम खरं म्हणजे एन्करेज करायला पाहिजे. एक साधं उदाहरण की ऍमस्टरडॅम शहर जे आहे हॉलंडमधलं तिथे तसंही त्या देशामधले लोक सायकली जास्त वापरतात. ऍमस्टरडॅमच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनने शहरामध्ये चार हजार सायकल फुकट ठेवून दिल्यात की ज्याला पाहिजे तो घेऊन जा... माणसं जास्त सायकली चालवायला लागली... अशा प्रकारच्या म्हणजे मेडिकल इन्शुरन्समध्ये दहा हजार किंवा चाळीस हजार कोटी रुपये खर्च करतं भारत सरकार... तर त्याच्याऐवजी खरं म्हणजे आरोग्य रक्षण करणारी धोरणं शासनाला कशी वाढवता येतील, शासनाला गावागावात आरोग्य संस्था उपलब्ध होण्यासाठी काय करता येईल, एक ही आशा योजना उत्तमच आहे तिला अजून समृद्ध आणि सबळ केलं पाहिजे, पण सोबतच अजून एका पुरुष कार्यकर्त्याची गरज आहे आणि त्याला मी म्हणतो अशोक... अशोक म्हणजे जो शोक निर्मूलन करेल... तर एका स्त्री कार्यकर्तीसोबत एक पुरुष कार्यकर्ताही हवा त्याचं नाव अशोक... तर आशा आणि अशोक मिळून यामध्ये आरोग्य व्यवस्था अधिक जास्त गावागावात व्यापक करायला पाहिजे. आणि त्यामध्ये निरोगी कसं राहता येईल गावाला... तर ही काही उदाहरणं झाली... अनेक उदाहरणं देता येतील, पण मी काही उदाहरणं देतो की शासनही काय करू शकतं.
प्रश्न - आपले पुस्तक धोरणकर्त्यांसाठी, समाजासाठी हाक आहे की आरसा?
डॉ. बंग - मी असं म्हणेन की बघा, माझ्या जीवनातल्या प्रत्यक्ष अनुभवातून, जगण्यातून जे दिसलं ते मी लोकांसमोर मांडलं. त्याच्यात तुम्ही म्हणालात तसं खरं म्हणजे वस्तुतः दोन्हीही आहे. त्यात आज समाजात काय घडलंय त्याचा आरसाही आहे आणि काय करायला हवं याची व्यक्तींना, कार्यकर्त्यांना, धोरणकर्त्यांना हाकही आहे. त्यामुळे तो आरसाही आहे आणि हाकही आहे. माझं स्वप्न असं की खरं म्हणजे आरोग्य स्वराज्य ही एक आरोग्य क्रांती व्हायला पाहिजे. ती नुसती उपचार पद्धती नाहीये. आरोग्य क्रांती व्हायला पाहिजे. आणि तिची खुबी अशी आहे की प्रत्येकच जण त्याची सुरुवात स्वतःच्या पासून करू शकतो, त्याच्यासाठी कुणाची वाट बघायची गरज नाही. त्याला कोणत्या कंपनीची औषधं लागत नाहीत किंवा कोणतं ऑपरेशन लागत नाही की प्रिस्क्रिप्शन लागत नाही... स्वतःचं आरोग्य स्वतःच्या हातात याच्याहून सुंदर काय असू शकतं...? खरं म्हणजे स्व स्थचा तोच अर्थ आहे. तर खरं स्वास्थ्य समाजात व्यापक करणे हा त्याचा हेतू आहे.
मुलाखत आणि शब्दांकन : दुर्गेश सोनार, सहायक संपादक, लोकमत