Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 06:35 IST2025-11-20T06:34:33+5:302025-11-20T06:35:41+5:30
Mahesh Sukhramani: पक्ष सोडून गेलेले माजी शहराध्यक्ष महेश सुखरामानी यांच्या फोटोला भाजप कार्यकर्त्यांनी काळे फासल्याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी बुधवारी दिलगिरी व्यक्त केली.

Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : पक्ष सोडून गेलेले माजी शहराध्यक्ष महेश सुखरामानी यांच्या फोटोला भाजप कार्यकर्त्यांनी काळे फासल्याबद्दल शहर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी बुधवारी दिलगिरी व्यक्त करीत हे कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पक्ष सोडून गेलेल्यांनी कधी काळी पक्ष वाढीसाठी योगदान दिल्याने त्यांच्या फोटोला काळे फासणे अयोग्य असल्याचे वधारिया म्हणाले, तर पक्ष उपऱ्यांच्या हाती गेल्याने हीच कृती अपेक्षित होती, अशी टीका सुखरामानी यांनी केली. उल्हासनगर भाजप जिल्हा कार्यालयात पक्ष सोडून गेलेल्या भाजपच्या माजी शहर जिल्हाध्यक्षाचे व नेत्याचे फोटो पुन्हा लावण्यात आले.
भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष सुखरामानी यांनी सहकाऱ्यांसह पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ओमी कलानी गटात प्रवेश केला. त्यांनी पक्ष सोडल्याच्या रागातून संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा मंगळवारी फोटो काढून, त्यावर शाई ओतून फोटोला काळे फासले. या घटनेबद्दल शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यावर, वधारिया यांनी झालेल्या घटनेचा निषेध करून, फोटोला काळे फासणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. पक्ष सोडून गेलेले माजी शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामानी यांच्यासह माजी नगरसेवक प्रकाश माखिजा, राम चार्ली पारवानी यांनी पक्षाला मोठे करण्यात योगदान दिल्याचे वधारिया यांनी म्हटले.
चारही नेत्यांची प्रतिमा समाजात चांगली
विद्यार्थीदशेपासून भाजपत कार्यरत राहिलेल्या सुखरामानी व पुरस्वानी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या विद्यमान नेतृत्वावर टीका केली. इतर पक्षातून आलेल्याच्या हाती पक्ष गेला. आ. कुमार आयलानी यांनी भाजपत प्रवेश घेतल्यानंतर, त्यांच्याकडे तीन वेळा आमदार पद, उपमहापौर पद, जिल्हाध्यक्ष, पत्नीकडे महापौर पद दिले. उपऱ्यांमुळे पक्ष सोडून गेलेल्या चारही नेत्यांची प्रतिमा सिंधी समाजात चांगली असून त्यांचा फटका भाजपला निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आ. आयलानी यांनी मात्र फोटोला काळे फासण्याच्या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.