भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:24 IST2025-01-20T15:23:25+5:302025-01-20T15:24:09+5:30

गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिवसेनेच्या वतीने खदखद बोलून दाखवली.

BJP should have thought about our people eknath Shinde shiv sena minister gulabrao patil attack | भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल

भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Gulabrao Patil: राज्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर महायुतीत मिठाचा खडा पडला असून नेत्यांकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून भाजपवर थेट निशाणा साधला आहे. "भारतीय जनता पक्षासाठी आम्ही काय केले आहे, याचा विचार भाजपने करायला हवा होता. भाजपने पालकमंत्रिपद देताना त्यांनी त्यांचे काय केले, हे महत्त्वाचे नाही. मात्र, पालकमंत्रिपद देताना भाजपने आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता," अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे. 

महायुतीकडून जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर केली. मात्र, पालकमंत्रिपदांच्या वाटपात शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले व दादा भुसे यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालेले नाही. याबाबत गुलाबराव पाटील यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खदखद बोलून दाखवली.

"मंत्री दादा भुसे व भरत गोगावले  हे आमच्या पक्षाचे जुने शिलेदार आहेत. त्यामुळे त्यांना पालकमंत्रिपद मिळायला हवे होते. नक्कीच त्यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यावर का अन्याय करण्यात आला, याबाबत आम्ही विचारणार आहोत," असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, "जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी माझ्यासह गिरीश महाजन व संजय सावकारे यांच्यात कोणतीही स्पर्धा किंवा रस्सीखेच नव्हती. पालकमंत्रिपदाचा निर्णय हा वरिष्ठांनी घेतला आहे. गिरीश महाजन, संजय सावकारे किंवा मीदेखील कधीही  पालकमंत्रिपदाबाबत इच्छुक असल्याबाबत प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे पालकमंत्रिपदाबाबत स्पर्धा वगैरे होती, हे म्हणणे चुकीचे आहे," असं जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Web Title: BJP should have thought about our people eknath Shinde shiv sena minister gulabrao patil attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.