विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 16:32 IST2025-08-19T16:31:11+5:302025-08-19T16:32:22+5:30
Vishal Parab News: गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या विशाल परब यांचं निलंबन भाजपाने आज अखेर रद्द केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या विशाल परब यांचं निलंबन भाजपाने आज अखेर रद्द केलं आहे. विशाल परब यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. दरम्यान, विशाल परब हे पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. ते घरातच होते. त्यामुळे याला घरवापसी म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्यानंतर दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे युवा नेते असलेले विशाल परब हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. त्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणीही केली होती. मात्र महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला होता. तसेच शिंदे गटाने तिथून विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर विशाल परब यांनी बंडाचा झेंडा हातात घेत अपक्ष निवडणूक लढवली होती. तसेच लक्षणीय मतं घेऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
दरम्यान, निलंबनाची कारवाई मागे घेतल्यानंतर विशाल परब यांना आज पुन्हा भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते पुन्हा भाजपामध्ये दाखल झाले. यावेळी भाजपाचे सिंधुदुर्गमधील जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
विशाल परब यांनी बंडखोरी केल्यानंतर सिंधुदुर्गच्या राजकारणात सक्रिय असलेल्या राणे कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे विशाल परब यांना पक्षाने पुन्हा एकदा संधी दिल्याने स्थानिक राजकारणात राणे कुटुंबीयांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.