बीड प्रकरणी SIT अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार? भाजपा नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 12:05 IST2025-01-03T12:05:19+5:302025-01-03T12:05:27+5:30
Beed Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत.

बीड प्रकरणी SIT अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार? भाजपा नेत्याचा दावा
Beed Santosh Deshmukh Case: मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. एसआयटीचे पथक चौकशीसाठी केजमध्ये दाखल झाले, तर इकडे बीड शहरात वाल्मीक कराडची एका खोलीत दिवसभर सीआयडीने चौकशी केली. तसेच हत्या प्रकरणातील सुदर्शन घुलेसह तीनही फरार आरोपींना वाँटेड म्हणून घोषित केले. सरपंच हत्या प्रकरणासह खंडणी व मारहाण या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे, तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटीची स्थापना केली आहे. यातच या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. परंतु, या घटनेत माझा काहीही संबंध नसताना मी राजीनामा द्यावा तर का द्यावा, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला आहे. यातच भाजपा नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मोठा दावा केला आहे.
बीड प्रकरणी SIT अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?
पत्रकारांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबत भाष्य केले. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी टीम नेमण्यात आली आहे. हे विशेष तपास पथक बीडमध्ये तपास करुन आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करेल. हा एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. वाल्मीक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल नसला तरी तेच याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. वाल्मीक कराड हे राज्याचे अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. गेली अनेक वर्षे ते बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे व्यवस्थापन करत आहेत. त्यामुळे वाल्मीक कराडांशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही, असे बोलले जाते. यामुळे आता धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.