“आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 06:24 PM2021-04-19T18:24:34+5:302021-04-19T18:28:34+5:30

remesivir injection issue: विरोधी पक्षनेते प्रविण दरेकराचं ठाकरे सरकारला खुलं चॅलेंज दिलं आहे.

bjp pravin darekar challenged thackeray govt over remdesivir injection issue | “आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज

“आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज

Next
ठळक मुद्देसरकारमधील मंत्र्यांची विधाने भरकटल्यासारखीठाकरे सरकार उघडे पडलंयएकदा नाही तर हजार वेळा चौकशी करा - दरेकर

मुंबई: आम्ही रेमडेसिवर इंजेक्शनचा काळाबाजार करत आहोत, असं सरकारला  वाटत असेल, तर आमच्याविरुद्ध कारवाईचे आदेश द्या, असे खुले आव्हान विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिले. संजय राऊत यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत भाजपने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती, पण श्रेयासाठी हे सर्व घडवून आणले, अशा अर्थाचा आरोप केला होता, त्याबाबत दरेकर आज माध्यमांशी बोलत होते. (pravin darekar challged thackeray govt over remesivir injection issue)

आपण हा सर्व घटनाक्रम बघा, मी दमणला गेल्यानंतर मंत्री राजेंद्र शिंगणेजी यांना फोन केला आणि त्यांना आश्वस्त केलं की, देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून महाराष्ट्रासाठी या कंपनीकडून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळू शकतात. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांशी  बोललो, सार्वजनिक आरोग्य तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांशी बोललो, अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी आणि या विभागाच्या सचिवांशी बोललो, सरकारच्या सर्व प्रमुख लोकांशी बोललो. मंत्र्यांबरोबर बैठक झाली, त्यांनीच अनुकूलता दाखवली, असे दरेकर म्हणाले. 

“कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदी १८-१९ तास काम करतायत, राजकारण करू नका”

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही

रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत राजकारण केलं गेलं.  मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला राऊत यांनी आम्हाला वेळ घेऊन द्यावी. कारण, सव्वा वर्षात मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना केवळ दोन वेळा बैठकीच्या निमित्ताने भेटले, ज्या गोष्टी सुचवल्या त्यामधील एकही गोष्ट त्यांनी केली नाही. त्यांच्याच सरकारमधील आरोग्य मंत्र्यांची ही खंत आहे की, त्यांनाही चर्चेसाठी वेळ मिळत नाही, त्यांना जे निर्णय अपेक्षित आहेत, ते त्यांना घेता येत नाहीत.  त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांचेच हे दुःख असल्यामुळे आणि आम्ही सरकारमधील सर्वांशी चर्चा, बैठका घेतल्या असल्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.

कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर

महाराष्ट्रातील जनता रोजच चितेवर जातेय

महाराष्ट्रातील जनता रोजच चितेवर जाते आहे. त्या चितेची चिंता खरं तर राऊत यांनी करायला हवी. दिल्लीच्या नाकात नळकांड्या घालण्यापेक्षा राज्यातील गोरगरीब लोकांना ऑक्सिजन, इंजेक्शन नाही, त्यासाठी काही तरी मेहनत करायला हवी. कदाचित राजकीय टीका करून त्यांना समाधान मिळेल. पण, त्यामुळे कोरोनाग्रस्तांचे प्रश्न सुटणार नाहीत, असा टोला दरेकर यांनी संजय राऊत यांना लगावला.

कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन अशक्य: अमित शाह

सरकारमधील मंत्र्यांची विधाने भरकटल्यासारखी

सरकारमधील मंत्र्यांची विधाने भरकटल्यासारखी आहेत.  साठा जर असेल तर तो जप्त करायला सरकारला कुणी अडवलं आहे. तो साठा राज्यातील जनतेसाठी उपलब्ध करून द्या. या सरकारचा बोगसपणा उघड झालेला आहे.   सरकारला मदत करायला तयार असताना सरकारचा इगो आणि अहंकार आडवा आला, आमच्यामार्फत इंजेक्शन येत नाहीत, देवेंद्रजी याना क्रेडिट मिळेल आणि आमची नाचक्की होईल, या भावनेतून हे सर्व राजकारण सरकार करीत आहे, असे सांगत बाळासाहेब थोरात यांना इंजेक्शनचे नावही नीट घेता येत नाही, अशी बोचरी टीका दरेकर यांनी यावेळी केली. 

आता एसटीचे ड्रायव्हर आणणार ऑक्सिजन टँकर: अनिल परब

ठाकरे सरकार उघडे पडलंय

ठाकरे सरकार उघडे पडले आहे. वैफल्यातून ही वक्तव्ये येत आहेत. केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर हे सरकार जेवढा वेळ घालवत आहे, त्याऐवजी ५ मिनिटे मुख्यमंत्र्यांनी, आरोग्य किंवा अन्न व औषध मंत्र्यांनी किंवा संजय राऊत यांनी मीडियासमोर यावे आणि बेड्स, ऑक्सिजन, इंजेक्शन किती आहेत, कुठे आहेत, कुणाशी लोकांनी संपर्क साधावा, हे एकदा स्पष्ट करावे, अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.

एकदा नाही तर हजार वेळा चौकशी करा

एकदा नाही तर हजार वेळा चौकशी करा. परंतु, विषय समजावून न घेता ट्वीट केले जात आहे. देवेंद्रजी आणि प्रविण दरेकर पोलीस स्टेशनला गेले याची चौकशी सरकार करणार का? साठा मिळाला असेल, तर चौकशीला कुणी अडवलं आहे? आमची तीच विनंती आहे की, हा साठा लवकर जप्त करा, काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा आणि तो साठा जनतेला उपलब्ध करून द्या. पण सरकार उघड पडलं आहे, त्यामुळे अशी भाषा सरकारकडून केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
 

Web Title: bjp pravin darekar challenged thackeray govt over remdesivir injection issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.