पंकजा मुंडे भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला; राजीनाम्यानंतरच्या पहिल्या भेटीत दोघांमध्ये दीड तास चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 22:52 IST2025-03-06T22:51:38+5:302025-03-06T22:52:19+5:30
हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जनक्षोभामुळे धनंजय मुंडेंना दोन दिवसांपूर्वी आपलं मंत्रिपद सोडावं लागलं.

पंकजा मुंडे भाऊ धनंजय मुंडेंच्या भेटीला; राजीनाम्यानंतरच्या पहिल्या भेटीत दोघांमध्ये दीड तास चर्चा
BJP Pankaja Munde: भाजप नेत्या आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांची त्यांच्या सातपुडा या निवासस्थानी भेट घेतली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जनक्षोभामुळे धनंजय मुंडेंना दोन दिवसांपूर्वी आपलं मंत्रिपद सोडावं लागलं. त्यानंतर बहीण पंकजा मुंडे यांनी आज त्यांची भेट घेत चर्चा केली आहे.
धनंजय मुंडे हे सध्या वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर मोठ्या आव्हानांचा सामना करत आहेत. एकीकडे त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तसंच मुंडे यांना Bell's palsy नावाच्या आजाराचेही निदान झाले आणि दुसरीकडे, त्यांच्या निकटवर्तीयाचा क्रूर हत्याकांडात सहभाग आढळला. या पार्श्वभूमीवर राजकीय कोंडी झाल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं. अशा संकटकाळात बहीण पंकजा मुंडे यांनी आज त्यांची भेट घेऊन विचारपूस केल्याचे समजते.
दरम्यान, २००९ पासून धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंशी राजकीय संघर्ष सुरू होता. मात्र २०२३ मध्ये राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत सत्तेत गेला. त्यानंतर मुंडे बहीण-भावाच्या राजकीय नात्यातही बदल झाला. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय यांनी पंकजा मुंडेंचं तर विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी धनंजय यांचं काम केलं. त्यामुळे दोघांमधील राजकीय दरी दूर झाल्याने ते एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असल्याचं दिसत असून पंकजा मुंडे यांनी आज घेतलेली धनंजय मुंडे यांची भेट त्याचाच एक भाग मानला जात आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काय म्हणाल्या होत्या पंकजा?
धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी उपरोधिक प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार्या नेत्यांना चिमटा काढला होता. "धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याच्या निर्णय योग्य आहे. त्याचे मी स्वागत करते, योग्य निर्णय. देर आए दुरुस्त आए, असंच म्हणावे लागेल. मुळात धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथच द्यायला नको होती. असे झाले असले तर पुढील प्रकार टळला असता. शिवाय त्यांचा राजीनामा घेणाऱ्यांनी देखील तो राजीनामा अगोदरच घ्यायला हवा होता," असं त्यांनी म्हटलं होतं.